उजव्या कोपर्यात गंगाखेड, परभणी असे लिहिलेले भरगच्च मजकुराचे पोस्टकार्ड उभ्याआडव्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही क्षेत्रात चळवळ्या असलेल्या कोणाहीकडे आले की ते श्रीनिवास कुलकर्णी यांचेच आहे हे क्षणात उमगायचे. वास्तविक श्रीनिवासचे मूळ गाव लातूर. तरुण वयातच आईवडिलांचे छत्र हरपले. पण व्यक्तिगत दु:खात ते कधीच हरवले नाहीत.
वेठबिगार प्रथेविरोधात देशव्यापी आंदोलन छेडलेल्या स्वामी अग्नीवेश यांचे नाव सत्तरच्या दशकात गाजत होते. १९७३ साली औराद शहाजनी येथे झालेल्या आर्य युवक परिषदेच्या शिबिराच्या निमित्ताने श्रीनिवासांना स्वामीजींशी संपर्क साधता आला. त्यानंतर आपले पुढील आयुष्य दलित कष्टकरी वर्गातील अन्यायाविरोधात पणाला लावायचे हे त्यांनी पक्के ठरवून टाकले. आयुष्यात कुठेही अर्ज करणार नाही, जातीप्रथेला उत्तेजन मिळेल असे काही करणार नाही, साधेपणाने आयुष्य जगेन अशी नियमांची चौकट स्वतःभोवती आखून घेतली आणि त्यानुसार वर्तनही केले.
१९७५ ची आणीबाणी, त्यानंतर परिवर्तनवादी चळवळीला लाभलेली गती या काळात श्रीनिवासांचा छात्र युवा संघर्ष वाहिनी, राष्ट्र सेवा दल अशा संघटनांशी संबंध आला. त्यांचा विवाहही १९८२ साली उद्गीर तालुक्यातील देवणी येथे छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या संघटनात्मक शिबिरात सर्व कार्यर्कत्यांच्या साक्षीने मंगला गायकवाड हिच्याशी झाला. गंगाखेडला त्यांचे घरही कष्टकरी वस्तीतच. तिथे शेतकर्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, सावकारी प्रथांचा पाश, बालकामगारांची परवड, अंधश्रद्धेने जगणे बाधित झालेल्यांचे प्रश्न अशा विविध समस्या घेऊन माणसे त्यनंच्याकडे विश्वासाने येत असत. असे प्रश्न विविध पातळ्यांवर सोडवावे लागतात आणि व्यवस्थेशी प्रसंगी टक्करही घ्यावी लागते. चिकाटी लागते. एक पैच्याही कमाईची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्मयोगच श्रीनिवासांनी जन्मभर आचरला होता.
रचनात्मक संघर्ष समिती, बचपन बचाओ आंदोलन, कष्टकरी सभा ही त्यांच्या सक्रियतेची माध्यमे होती. गेली १६ वर्षे त्यांनी प्रामुख्याने बालकामगारांचा प्रश्न हाती घेतला होता. अल्लड, खेळण्या बागडण्याच्या वयात कष्टाला जुंपलेली कोवळी मुले पाहून त्यांच्या मनाला अपार खिन्नता वाटे. शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यातील बालमजुरांबाबत त्यांनी जमा केलेली माहिती हादरवणारी होती. त्या माहितीच्या आधारावर त्यानंतर असंख्य चिमुकल्या जीवांना या मगरमिठीतून सापळे रचून सोडविण्यात आले. आज राज्यातील १८ जिल्ह्यांत बचपन बचाओ आंदोलनाचे काम चालू आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे ८०० जणांना हक्काच्या जमिनी मिळाल्या. श्रीनिवास यांची वाचनाची भूकही प्रचंड होती.
( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )
Leave a Reply