मराठी कादंबरीक्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणार्या श्रीपाद नारायण पेंडसे म्हणजेच श्री. ना. पेंडसे यांचा जन्म ५ जानेवारी १९१३ साली झाला.
शालेय शिक्षणानंतर त्यांनी बी. एस्सी. ची पदवी मिळवली. त्यानंतर बी. ई. एस. टी. मध्ये ते रूजू झाले. त्यांच्या लेखनाला कथा लेखनापासून सुरुवात झाली. १९३८ मध्ये सह्याद्री मासिकात त्यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली.
१९४१ साली त्यांचे पहिले पुस्तक ‘खडकावरील हिरवळ’ प्रसिद्ध झाले. त्यानंतर हिंदू-मुसलमानांच्या दंग्यावर आधारलेली ‘एल्गार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ‘हद्दपार’ ही कादंबरी खूपच लोकप्रिय झाली. पुढे ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ इ. कादंबर्यांनी यशाचे शिखर गाठले. १९६२ साली लिहिलेल्या ‘रथचक्र’ या कादंबरीला १९६४ साली साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.
पेंडसेंच्या सुरुवातीच्या कादंबर्यांमधे कोकणचा प्रदेश आणि त्यातली माणसे हे वर्णन प्रकर्षाने येत असे. पण ‘लव्हाळी’ आणि ‘ऑक्टोपस’ ला मुंबईची पार्श्वभूमी आहे. ‘ऑक्टोपस’चे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी केवळ पात्रांच्या संवादातूनच पुढे जाते.
त्यानंतरची पेंडस्यांची चैतन्यपूर्ण कादंबरी म्हणजे ‘तुंबाडचे खोत’. चार पिढ्यांच्या कहाणीची ही चौदाशे पानांची कादंबरी दोन खंडात विभागली आहे. मानवी वृत्तीचे गूढ, कोकणातील निसर्ग, जिवंत व्यक्तिचित्रण, नाट्यपूर्ण संवाद आणि ओघवते निवेदन यामुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड घेते.
‘गारंबीचा बापू’, ‘राजे मास्तर’, ‘यशोदा’, ‘संभुसांच्या चाळीत’, ‘असं झालं उजाडलं’, ‘चक्रव्यूह’, ‘रथचक्र’ ह्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवरही यश प्राप्त केलं. ‘जुम्मन’ नावाचा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. ‘श्री. ना. पेंडसे ः लेखक आणि माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.
श्री. ना. पेंडसे यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे (5-Jan-2017)
कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे (24-Mar-2017)
Leave a Reply