श्रीराम कृष्णाजी बोरकर हे गेली ४०-४५ वर्षे, वृत्तपत्रांच्या ग्रंथपरीक्षणातून झळकणारं ठाण्यातल्या लेखकांमधल एक परिचित नाव, आतापर्यंत “उध्वस्त स्वप्न”, “माणसे जोडण्याची कला”, “दत्त पद्मायन” यांसारखी विविध विषयांवरील १६ पुस्तके बोरकरांच्या नावावर प्रसिद्ध झाली आहेत.
बोरकर यांचा ८४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला प्रसिद्ध झालेल्या “श्रीस्थानक” या स्मरणिकेत एक संपादक म्हणून सहभाग होता. ठाण्यातील अनेक वाड़्मयीन सांस्कृतिक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.
मराठीच्या साहित्यिक व सांस्कृतिक वर्तुळात त्यांची प्रतिमा ‘ज्येष्ठ समीक्षक’ अशीच आहे. साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘चांगुणा’ कादंबरीवर त्यांनी केलेलं विस्तृत परीक्षण जुन्या लोकांना अजूनही आठवत असेल. ‘उत्कट सहृदयता आणि अथांग सहानुभूती यांचा हृदयंगम अविष्कार’ असा मोठा मथळा देऊन आचार्य अत्रे यांनी आपल्या नवयुग साप्ताहिकात त्याला प्रसिद्धी तर दिलीच, पण स्वहस्ताक्षरात पत्र लिहून बोरकरांमधल्या समीक्षकाला दाद दिली. महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार आवृत्तीत तब्बल १५ वर्षे त्यांनी केलेली २५० पुस्तकांची परीक्षणे खूप गाजली. विविध वृत्तपत्रांतून आलेल्या ५१ पुस्तकांवरील परीक्षणांचा संग्रह ‘आस्वादक समीक्षा’ या नावाने प्रसिद्ध आहे.
आजवरच्या प्रवासाबद्दल “समाजरत्न पुरस्कार”, “सक्रीय सहयोग पुरस्कार”, “साहित्य समीक्षक पुरस्कार” अश्या अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तरुणपणातच आचार्य अत्रे आणि चित्रमहर्षी व्ही. शांताराम या दोन कलासक्त माणसांशी जवळून संबंध आल्यामुळे आपला जीवनविषयक अनुभव अधिक समृद्ध झाला, असे ते कृतज्ञतापूर्वक सांगतात. त्यांच्या नावावर कथासंग्रह, ललित निबंध, ओवीबद्ध चरित्र, निबंध संग्रह, ग्रंथपरीक्षणे, कादंबरी अशी समृध्द ग्रंथसंपदा आहे. श्रीमहाभारतावर लिहिलेला त्यांचा ६५० पृष्ठांचा ग्रंथ वेगळ्या धाटणीचा आहे. साहित्याने माणसांच्या स्वभावदोषांकडे सहिष्णूवृत्तीने बघायला शिकविले व अंतर्मुख केले असे ते म्हणतात.
श्रीराम बोरकर अंधश्रद्धेपासून शेकडो कोस दूर असले , तरी वैचारिक पिंड आणि मूलग्राही शोध घेण्याची वृत्ती यामुळे तत्त्वज्ञान, वेदवाङ्मय आणि संतसाहित्य यामध्ये त्यांना विशेष रस आहे. अध्यात्म, साधना, तपश्चर्या, सिद्धी या शब्दांना ते बिचकत नाहीत वा त्यांना झटकूनही टाकीत नाहीत. कुटुंबात आणि गोतावळ्यात ‘दादा’ या नावाने ओळखले जाणारे बोरकर भिडस्त पण सहृदय आहेत.
( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स आणि माझे ठाणे)
Leave a Reply