शुभांगी पांगे या कायमच पडद्याआड राहिलेल्या वाड्:मयसेवक आहेत. त्यांची मराठी साहित्य आणि व्यवहार यांवरची निष्ठा इतकी प्रखर की, बी.ए. आणि एम.ए. केल्यानंतर याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार त्यांनी केला. आधी सदानंद आणि रामदास या भटकळ बंधूंच्या ‘पॉप्युलर’ संस्थेत त्यांनी काम केले. लेखकाकडून येणारी वही हे पुस्तकाचे अनघड रूप असते. त्यावर बरेच संस्कार होऊन मग त्याला सुघड गंथरूप येते. ते रूप देण्याची कला पांगे ‘पॉप्युलर’मध्ये शिकल्या. त्यानंतरचा प्रदीर्घ काळ त्या ‘मॅजेस्टिक’ परिवारात रमल्या !’मॅजेस्टिक’ चा अथांग पसारा गंथप्रकाशन, गंथविक्री, ‘दीपावली’ दिवाळी अंक, ‘ललित’ हे गंथप्रसार मासिक आणि ‘मॅजेस्टिक गप्पां’सारखा वाचकांशी सुसंवाद साधणारा उपक्रम असा विविधांगी आहे. या सार्यांशी पांगे यांचे जिव्हाळ्याचे नाते जुळले आहे. वाचकप्रिय ‘ललित’, नेटक्या रूपात दरमहा निघण्यात पांगे यांचा सिंहाचा वाटा आहे. पुस्तकांच्या धंद्यात माणसांशी असणार्या संबंधांना फारच मोल असते. त्यातच किंचित लेखकांनाही ‘ग’ ची बाधा होत असते. अशा सर्व प्रकारच्या ज्येष्ठ, कनिष्ठ लेखकांशी जिव्हाळ्याचे संबंध राखावेत तर ते पांगे यांनीच. त्या न चिडता, समजूतदार स्वरात सर्वांशी बोलतात आणि असंख्य पुस्तकांचे सुईणपण निभावतात. इतरांनी लिहावे, यासाठी धडपडणार्या पांगे स्वत: मात्र तुलनेने कमी लिहितात. तशी त्यांनी बरीच पुस्तक परीक्षणे केली आहेत. महिलांच्या समस्यांचा वेध घेणारे सदरही चालवले. पण सर्व व्यापांमधून स्वत:च्या लेखनासाठी त्यांनी वेळ काढला तर वाचकांना चांगले लेखन वाचायला मिळेल.
सध्या मराठी पुस्तके खपत असली तरी गुणी, जाणकार माणसांनी ग्रंथ व्यवहारात यावे आणि उत्कृष्ट मोबदल्याची अपेक्षा करावी, अशी स्थिती आजही नाही. अशावेळी निष्ठा हीच कामाची प्रमुख प्रेरणा असते. तशी निष्ठा पांगे यांच्यात पुरेपूर आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने या निष्ठेचा गौरव झाला. पांगे यांच्यासारखे दहापाच कर्तुत्ववान वाड्:मयसेवक निर्माण झाले तरी मराठी गंथसमृध्दीची पताका आणखी उंच लवलवेल.
( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )
Leave a Reply