वर्दे, सुधा

sudha varde
स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्रीय सेवादलाशी जोडले गेलेले प्रमुख महिलांपैकी एक नाव आणि राष्ट्रीय सेवादलाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणजे सुधा वर्दे. माहेरचं अनुताई कोतवाल हे नाव असलेल्या सुधाताईंचा जन्म १९३२ सालचा;लहानपणापासूनच सुधाताईंना विविध कलांची आवड होती. नृत्यात तर सुधाताइंनी विशेष प्राविण्य मिळवले होते.त्याशिवाय रंगभुमीवर पण त्या सफाईदारपणे वावरत.शिक्षणात देखील त्या अव्वल होत्या. महाविद्यालयीन जीवनापासून त्या सेवादलाशी जोडल्या गेलेल्या होत्या.राष्ट्रीय सेवा दलात कार्यरत असलेले प्रा.दिलीप वर्दे यांच्यांशी त्यांचा प्रेमविवाह झाला. त्यांच्यासोबत लग्न करण्याचं एकमेव कारण म्हणजे “लगननंतरही सेवादलात काम करायला मिळणार हेच होतं!” सेवादलाशिवाय दुसरा विचार सुधाताईंच्या मनात नव्हता; तसे बर्‍याचवेळेला त्यांनी बोलूनही दाखवले होते सुधाताईंचा सेवादलातील कलापथकातील विविध कार्यक्रमात हरहुन्नरीचा सहभाग असे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतर भागांतूनही कलाकर यावेत म्हणजे समाजवादी चळवळ फोफावेल, असा विचार करून त्यांनी मुंबईबाहेर जाऊन शिबिरं घेतली.
कलापथकाचा आरंभीचा उद्देश लोकरंजनातून लोकशिक्षण हा तर होताच.पण त्याशिवाय एकमेकांसाठी जगणं व सर्वांनी मिळून उपभोगणं या संस्कारांचाही प्रचार करण्याचा प्रयत्न केला. कलापथकाच्या कार्यक्रमासाठी पन्नास तरुण मुला-मुलींचा गट घेऊन महिना दीड महिना एकत्र फिरायचं, रात्र रात्र प्रवास करायचा असा त्यांचा शिरस्ता असायचा. त्यांच्यासोबत प्रा.वसंत बापट, भाऊ रानडे, लीलाधर हेगडे अश्या दिग्गजांची साथ असे. कविवर्य वसंत बापट यांच्यासोबत त्यांनी देशभरात गल्ली ते दिल्ली, बिनबियांचे झाड, भारत दर्शन, महाराष्ट्र दर्शन आदी कार्यक्रम केले. “भारत दर्शन या कार्यक्रमात ओरिसातील लोकनृत्य बसविण्याचा निर्णय घेतला.नृत्याचा अभ्यास करण्यासाठी सुधाताई ओरिसाला बर्‍याचवेळेला एकट्या जात होत्या.वसंत बापटांची सामूहिक गीते त्यांनी शाहीर लीलाधर हेगडे यांच्यासोबत मुलांना शिकविली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत दिल्लीत त्यांनी “महाराष्ट्र दर्शन” कार्यक्रम सादर केला तेव्हा कार्यक्रम पाहून नेहरू भारावून गेले व त्यांनी प्रत्येक कलाकारांचे विशेष अभिनंदन केले होते.
“ग्रंथाली”ने प्रकाशित केलेल्या “गोष्ट झर्‍यांची” या आत्मचरित्रात त्यांनी दुसर्‍यांसाठी जीवन जगताना मिळालेला आनंद व भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात प्रा. सदानंद वर्दे यांना, आणि त्यानंतर आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह केल्याच्या आरोपाखाली सुधाताईं वत्यांची कन्या झेलमला सुद्धा अटक झाली होती.या सर्व अनुभवांचे वर्णन सुधाताईंनी या आत्मचरित्रात केले आहे.
९ एप्रिल २०१४ या दिवशी सुधाताई वर्दे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी,अंधेरीत इथल्या रहात्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*