सुधीर भट

नाट्यनिर्माता संघाचा अध्यक्ष, नाटकांच्या तारखा आणि तिकीविक्री या विषयावर स्वतःची मते ठामपणे मांडणारा निर्माता म्हणून सुधीर भट यांची विशेष ओळख होती व राहील. त्यांनी गोपाळ अलगेरी यांच्या साथीने सुयोग या नाट्यसंस्थेची १ जानेवारी १९८५ मध्ये स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि एकहजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणार्‍या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारा वादग्रस्त निर्माता म्हणून भट चर्चेत राहिले.उच्च निर्मितीमूल्ये आणि मार्केटिंग या जोरावर त्यांची नाटके तुफान गाजली. पण काही नाटकांना अपयश आल्यामुळे सुयोगला मोठा आर्थिक फटकाही बसला. मात्र अखेरपर्यंत उत्साहाने नाट्यनिर्मिती करण्याचे व्रत त्यांनी कायम ठेवले. मोरूची मावशी या नाटकाने २०४२, एका लग्नाची गोष्ट आणि चार दिवस प्रेमाचे या नाटकाने सुध्दा हजाराच्या वर प्रयोग केले. सुयोग या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून सुधीर भट यांनी अप्पा आणि बाप्पा, उडुनी जा पाखरा, एकदा पहावं करून, एका लग्नाची गोष्ट, करायला गेलो एक, कलम ३०२, कशी मी राहू अशी, कश्यात काय लफड्यात पाय, किरवंत, गांधी विरुद्ध गांधी, चार दिवस प्रेमाचे, जावई माझा भला, झालं एकदाचं, तरुण तुर्क म्हातारे अर्क, ती फुलराणी, दिनूच्या सासूबाई राधाबाई, निष्पाप, प्रीतिसंगम, प्रेमा तुझा रंग कसा, बे लालना राजा (गुजराती भाषेत), ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, वा गुरू!, व्यक्ती आणि वल्ली, श्री तशी सौ, श्रीमंत, संध्याछाया, सुंदर मी होणार, हवास मज तू, हसत खेळत, हीच तर प्रेमाची गंमत आहे अश्या लोकप्रिय व दर्जेदार नाटकांची निर्मिती केली.मराठी नाट्यसृष्टीच्या पडत्या काळात १९९७-९८ च्या सुमारास अमेरिकेत नाटकांचे प्रयोग करुन त्यांनी नाट्यसृष्टीला उर्जितावस्थेत आणले तसंच नाटकांच्या प्रयोगावेळी कलाकारांची पंचतारांकित हॉटेलात रहाण्याची सोय करण्याचा पायंडा सुधीर भट यांनी रचला. निर्माता या नात्याने सुधिर भट यांनी हलक्या-फुलक्या नाटकांपासून गंभीर विषयांवरील नाटकांपर्यंत सर्व विषय हाताळले व वेगवेगळ्या अभिनव उपक्रमांद्वारे त्यांनी मराठी नाट्यसृष्टीला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. वयाच्या ६३व्या वर्षी १५ नोव्हेंबर २०१३ या दिवशी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मुंबईत त्यांचे निधन झाले.

(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट (13-Jun-2017)

मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट (21-Nov-2017)

ज्येष्ठ मराठी नाट्यनिर्माते सुधीर भट (16-Apr-2019)

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट (14-Nov-2021)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*