मुंबईच्या व्यावसायिक वर्तुळामध्ये सुधीर राशिंगकर यांचे नाव माहित नसलेला उद्योजक विरळाच असावा, एवढया सक्रियतेने व सक्षमतेने आपल्या उत्तुंग कारकिर्दीत, मुंबईच्या व्यावसायिक विस्तारीकरणामागे त्यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. शैक्षणीक दिवसांपासुनच त्यांच्यातील इतरांना दिपवणारी बुध्दिमत्ता, व दुसर्यांना सतत आपल्या खिशांत ठेविण्यासाठी लागणारी संभाषण कला त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली पाहून ते व्यावसायिक उड्डाणपट्टीवर, आपल्या यशाचे विमान लीलया उडवू शकतील, याची त्यांच्या घरच्यांना चांगलीच कल्पना होती. घरच्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याने ते या व्यावसायिक दलदलीमध्ये आपला पाय भलत्याच आत्मविश्वासाने रोवू शकले. इलेक्ट्रीकल व मॅकेनिकल इंजिनीअरींग मध्ये विशेष वर्गात [डिस्टींक्शन मिळवून] उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी टेल्को व कुपर इंजिनीअरींग यांसारख्या नामांकित कंपन्याच्या अधिकारी वर्गामध्ये, नोकरी करून आपल्या अफाट कार्यक्षमतेची व प्रसंगावधानी निर्णय कौशल्यांची झलक दाखवून दिली होती. त्यांच्या कारकिर्दीतच, या कंपन्यांची व्याप्ती बहरली, गुणवत्ता व प्रतिष्ठा या दोन्ही पैलुंच्या बाबतीत या कंपन्यांना निराळीच चमक प्राप्त झाली. परंतु यापेक्षाही मोठी भरारी घेण्याची महत्वाकांक्षा व बळ आपल्या पंखांमध्ये आहे याची त्यांना पुरेपुर खात्री असल्यानेच त्यांनी स्वतःचा व्यवसाय थाटण्याचा धाडसी निर्णय घेतला. सध्या त्यांनी आपलं सर्वस्व, भारताच्या व्यावसायिक मातीमध्ये आपल्या व्यवसायाचे दर्जेदार पीक घेण्यास आसुसलेल्या स्वदेशी व विदेशी कंपन्यांना इंजिनीअरींग क्षेत्रामधील शिक्षण व संशोधन वृध्दिंगत करण्यासाठी मार्केटिंगची अद्यतावत तंत्रे व साधने विकसीत करून देणे, या व्यवसायाकरिता बहाल केलेलं आहे. मार्केटिंगच्या साधनांबरोबरच या कंपन्यांना आधुनिक यंत्रसंपदा पुरविणे, तसेच त्यांचे विवीध टर्न की प्रोजेक्टस राबविण्याकरिता व्यवस्थापनासंबंधीचे सल्ले देणे व त्यांच्या धोरणांची आखणी करणे अशा अनेक अतिरीक्त जोडकामांची पुर्तता देखील त्यांच्या कंपनीकडुन उत्तमरित्या केली जाते. त्यांनी आतापर्यंत कितेक नामांकित विदेशी कंपन्यांकरिता वरील प्रकारची साधने निर्माण केली असल्यामुळे ते भारताबाहेरसुध्दा अतिउत्कृष्ठ मार्केटिंगची साधने पुरविणारे व्यावसायिक या विशेष ओळखीने संबोधले जातात. आजगायत त्यांनी कुठल्याही कंपनीला, मग ती स्वदेशी असो वा विदेशी, आपल्या गुणवत्तेबाबतीत व पुरविल्या गेलेल्या मालाच्या प्रतीबाबतीत कधीच निराश न केल्यामुळे हजारो व्यावसायिकांची त्यांच्या कार्यावर अतुट श्रध्दा बसलेली आहे. अनेक शेजारील देशांच्या कंपन्यांशीदेखील, ते ही साधने पुरविण्याकरिता, नियमीत तत्वांवर बांधले गेले आहेत. राशिंगकरांचे हे अद्ययावत ज्ञान व या क्षेत्रामधला असामान्य अनुभव हा त्यांच्या वैयक्तिक सुकर्तुत्वाप्रमाणेच त्यांच्या अफाट परदेशवारीमधून व त्या प्रत्येक प्रवासामधुन त्यांनी वेचलेल्या कडु-गोड अनुभवांमधुन आला आहे. गेली 19 वर्षे ते त्यांच्या कामानिमीत्तने सतत परदेशात असतात व अत्यंत डोळसपणे ते प्रत्येक क्षणातुन काहीना काही नवीन हे शिकतच असतात. त्यांनी त्यांची पी. एच. डी. डिग्री पुणे विद्यापीठाकडून संपादन केली. त्यावेळी त्यांनी रोटरी इंटरनॅशनल सारख्या स्वयंसेवी समाजसेवी संस्थाचे व्यवस्थापन कसे होते, व त्यांच्या व्यावसायिक प्रशासनाचे कार्य कशा प्रकारे चालते हा वेगळा व रोचक विषय निवडून त्यावर लांबलचक प्रबंध सादर केला होता. ते आजही विवीध नामांकित सामाजिक व व्यावसायिक संस्थांच्या कार्यकारिणी यंत्रणांमध्ये निरनिराळ्या क्षमतांमध्ये काम करीत आहेत. जे इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्स मधील सदस्यपद, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन साठी आजीवन सदस्यपद, ट्रायबोलॉगी सोसायटी ऑफ इंडिया चे सदस्यपद इत्यादी पदे त्यांनी भुषविली आहेत. तसेच ते एन्टरप्रिनीअर्स इंटरनॅशनल या संस्थेचे गेली अनेक वर्षे माजी अध्यक्षदेखील होते. त्यांच्या नावावर अनेक चॅरिटेबल ट्रस्टस देखील स्थापन केली गेली आहेत. सध्या ते मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर या बडया गटाच्या मुख्य कार्यकारिणीचे सदस्य, तर त्यांच्या संपदा नावाच्या मासिकासाठी लाभलेले अष्टपैलु लेखक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक लेखांमधून त्यांनी त्यांच्यामध्ये इतकी वर्षे सतत जागत्या ठेविलेल्या प्रतिभावंत लेखकाचे अभुतपुर्व दर्शन घडते. राशिंगकरांना त्यांच्या एवढया वर्षांच्या निष्कलंक व्यावसायिक सेवेमुळे व सामाजिक स्तरातील त्यांच्या योगदानामुळे कित्येक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. समाज भुषण, डिस्टीनग्युश्ड सर्व्हिस अॅवॉर्ड, रोटरी फाउंडेशनचा ‘सिटेशन फॉर मेरिटोरियस सर्व्हिस’ हा मानाचा पुरस्कार, तसेच रोटरी इंटरनॅशनल तर्फे दिला जाणारा सर्वात सन्मानित व मोठा गौरव म्हणजे ‘सर्व्हिस अबोव्ह सेल्फ अॅवॉर्ड’ अशा अनेक पुरस्कारांची त्यांच्या कारकिर्दीला सुवर्णकिनार लाभलेली आहे. त्यांनी आतापर्यंत 25 हुनही जास्त पुस्तकांचे, लेखांचे व संदर्भपुस्तिकांचे पालकत्व यशस्वीरित्या निभावलेले आहे. रोटरी जिल्हा गव्हर्नर ची सुत्रे देखील त्यांनी 1991 ते 1992 दरम्यान प्रभावीपणे सांभाळली होती. यादरम्यान त्यांनी विवीध समाजसेवी संघटनांच्या कित्येक सभांमध्ये, कन्व्हेनशन्समध्ये, सेमिनार्समध्ये, कार्यालयीन बैठकींमध्ये, प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये, तसेच समारंभांमध्ये की नोट स्पीकर, पॅनल चेअरमॅन, गटचर्चा प्रमुख अशा निरनिराळ्या भुमिकांमध्ये पुर्णपणे बुडुन इतर उद्योजकांना प्रेरित करण्याची जबाबदारी अत्यंत सफाईदारपणे वठविली होती. ते स्वतः कितीतरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे व व्यक्तिमत्व विकसन शिबीरांचे विद्यार्थी आहेत.
Leave a Reply