सुधीर वैद्य हे भारतामधील अत्यंत प्रथितयश व सर्वपरिचीत असे व्यावसायिक संख्यातज्ञ, संकलक, व क्रिकेटविषयक चतुरस्त्र लेखन करणारे प्रतिभावंत लेखक आहेत.
गेली ५० वर्षे भारतामध्ये व भारताबाहेर खेळवल्या गेलेल्या प्रत्येक कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा संपूर्ण लेखाजोगा, त्या सामन्यातील प्रत्येक रंगतदार क्षणांसह त्यानी आपल्या संग्रही जतन केला गेल्या असल्याने, साहजिकच क्रिकेटमधील जाणकारांचा व चाह्त्यांचा त्यांच्याकडे कायम राबता असतो.
क्रिकेट डोळसपणे पाहण्याची व त्यातील सर्व बारीक घडामोडी, तांत्रिक आकडेमोड, गोलंदाजांनी टिपलेले बळी, फलंदाजांनी ठोकलेल्या धावा, पकडले गेलेले झेल, दोन्ही संघांच्या व्यूहरचना व धावसंख्या एवढेच काय, तर त्या सामन्याचे ठिकाण व ऐतिहासिक महत्व अशा ‘अ पासून ते ज्ञ’ पर्यंतच्या सगळ्या तांत्रिक व अतांत्रिक माहितीचे संकलन करणे, ही त्यांची, लहानपणापासून जाणीवपुर्वक वृध्दिंगत केली गेलेली आवड होती. या आवडीला व्यावसायिक साचा देण्यात ते पुर्णतः यशस्वी ठरले आहेत.
गेली पंधरा वर्षे भारतीय क्रिकेट बोर्ड त्यांच्या अचूक विश्लेषणांचा व काळजीपुर्वक केल्या गेलेल्या सांख्यिक निरीक्षणांचा लाभ अव्याहतपणे घेत आहे. असामान्य विश्वासार्हता, ही त्यांनी आजवर या क्रीडा पटलावरती निरंतर काम व प्रामाणिक मेहेनत करून केलेली कमाई आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाकडून दर वर्षी संपादित व प्रकाशित केल्या जाणार्या विविध सांख्यिक वार्षिक अंकांचे लेखन गेली अनेक वर्षे ते नियमीतपणे करत आले आहेत. क्रिकेट या खेळाचा जेव्हा व्यावसायिक दृष्टीने पुनर्जन्म झाला, तेव्हापासून आतापर्यंत झालेले जवळजवळ २००० कसोटी सामने, ३,१०० एकदिवसीय सामने, व ५००० प्रथम श्रेणी क्रिकेट सामने, या सगळ्या सामन्यांचा विस्तृतपणे घेतलेला आढावा, तसेच सांखिक व असांख्यिक माहितीचा दुर्मिळ खजिना त्यांच्याकडे, विविध आकाराच्या फाईली व रजिस्टर पुस्तकांमध्ये सुरक्षित आहे. यासाठी नुकतीच त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्येही झाली आहे.
गेली अनेक वर्षे सुधीर वैद्य यांचा मुक्काम ठाणे शहरात आहे. मध्यंतरी दाभोळ येथील एन्रॉन वीज प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी म्हणुनही त्यांनी काम पाहिले होते.
Leave a Reply