सत्तरीच्या दशकाचा काळ हा मराठी व्यावसायिक नाटकांच्या बहराचा काळ. या काळात अनेक गुणी कलावंत मराठी रंगभूमीला मिळाले. या कालखंडात अभिनेत्रींची एक सशक्त फळी उभी राहिली. त्यात सुहास जोशींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भक्ती बर्वे, रिमा, नीना कुळकर्णी, भारती आचरेकर, दया डोंगरे यांच्यातलेच हे एक झळाळते नाव.
मराठी रसिकांना त्या प्रथम भावल्या, त्या विजया मेहता दिग्दर्शित आणि जयवंत दळवी लिखित ‘ बॅरिस्टर ‘ मध्ये आणि काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत ‘ आनंदी गोपाळ ‘ मध्ये.
त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अल्काझींच्या मार्गदर्शनाखाली नाट्यशिक्षण घेतले. गौरवर्ण, टपोरे डोळे, मध्यम बांधा आणि शब्दांवर विशिष्ट आघात देत संवाद फेकण्याची लकब यांमुळे त्यांचा रंगमंचावरील वावर लक्षवेधी ठरे. या वैशिष्ट्यांनिशी त्या गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिकांत लीलया वावरत. त्यामुळे अल्पाक्षरी संवाद म्हणणारी ‘ बॅरिस्टर ‘ मधील त्यांची राधा जशी लक्षात राहिली, तशीच सई परांजपेंच्या ‘ सख्खे शेजारी ‘ मधील मध्यमवर्गीय गृहिणीही.
पुढे ऐंशीच्या दशकात आलेल्या तेंडुलकरांच्या ‘ कन्यादान ‘ नाटकातील त्यांची व्यक्तिरेखा प्रमुख नसली तरी अत्यंत ठाशीव आणि प्रभावी होती. या नाटकात डॉ. श्रीराम लागू प्रमुख भूमिकेत होते. सुहास जोशींनी डॉ. लागू यांच्याबरोबर केलेली ‘ अग्निपंख ‘, ‘ नटसम्राट ‘, ‘ एकच प्याला ‘ ही नाटके गाजली. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘ स्मृतिचित्रे ‘ चे त्यांनी एकपात्री प्रयोग केले. त्यानंतर त्यांनी काही मालिका आणि हिंदी चित्रपटही केले. परंतु त्या खर्या अर्थाने नाटकात रमल्या.
त्यानंतर काही काळ प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्यांनी कामे कमी केली, तरीही ‘ कथा ‘ आणि ‘ सावधान शुभमंगल ‘ या अगदी अलीकडच्या नाटकांतही त्या आपले वेगळेपण दाखवून गेल्या. त्यांचे पती सुभाष जोशी हेही नाटकवेडे आणि प्रायोगिक नाट्यचळवळीतील कलावंत असल्यामुळे सुहास जोशी या व्यावसायिक नाटकांत रमल्या, तरीही प्रायोगिक नाटकांविषयी व तरुण रंगकर्मींविषयी त्यांना विशेष आस्था वाटत राहिली. त्यातूनच त्या येऊर येथील आपल्या घरी हौशी-प्रायोगिक नाट्यप्रयोगाचे दर महिन्याला आयोजन करीत असत.
आपल्या अवतीभोवतीच्या सामाजिक घडामोडींविषयी जागरुक असणे, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. काही वर्षांपूर्वी ठाण्याचे आयुक्त चंद्रशेखर यांच्या बदलीविरोधात ठाणे शहरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनात त्या अग्रभागी होत्या. त्यांच्या सांस्कृतिक योगदानाची दखल घेत ठाण्यातील ‘ इंद्रधनू ‘ या संस्थेने त्यांना ‘ युवोन्मेष ‘ पुरस्कार देऊन गौरविले होते. अ. भा. मराठी नाट्य परिषदेने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करून त्यांच्या अवघ्या कारकीर्दीला सलाम केला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
—————————————————————————————–
Leave a Reply