चव्हाण, सुलोचना
नाव गाव कशाला पुसलता
अहो, मी आहे कोल्हापूरची
मला हो म्हणतात लवंगी मिरची
१९६२ मध्ये निघालेल्या ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ही लावणी सुलोचना चव्हाण यांनी गायली आणि त्यांचे सारे आयुष्यच बदलून गेले. तोवर एक उत्तम गाणारी कलाकार म्हणून त्या सगळ्यांनाच माहीत होत्या. श्यामसुंदर, शमशाद बेगम यांच्याबरोबर गायलेले ‘सावन का महिना, कैसे जीना’, किंवा गीता दत्तबरोबर गायलेले ‘चंदा की चाँदनी है’
अशी हिंदी चित्रपटातील गाजलेली अनेक गीते लोकप्रिय झाली होती. वसंत देसाई, चित्रगुप्त, श्यामसुंदरसारख्या त्या काळातील प्रसिद्ध संगीतकारांनी त्यांच्याकडून अनेक गीते गाऊन घेतली होती. जोडीला मराठी गीते, गुजराथी गीते, एवढेच काय बॅलेसाठीही त्या गात असत. वसंत पवार यांच्या पहिल्याच संगीतदिग्दर्शनासाठी त्यांनी सुलोचनाबाईंचा आवाज घेतला आणि त्यांचे सारे जीवनच बदलून गेले. आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ असा किताब दिला. सुलोचनाबाईंची लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड होणे हा केवळ लावणीचा सन्मान नाही, तर आयुष्यभर निष्ठेने कलेचा ध्यास घेऊन ती कायम शालीनपणे व्यक्त करणाऱ्या एका समर्पित कलावतीचा सन्मान आहे.
सुलोचनाबाईंचा जन्म १९३३चा. चित्रपट बोलायला लागून अवघी दोनच वर्षे झालेली. तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावरच्या संगीत नाटकांना बोलपटांमुळे ओहोटी लागायला सुरूवातही झालेली. केवळ स्वरांच्या ओढीने कलेच्या प्रांगणात अवतरलेल्या या कलावतीने अगदी लहान वयातच गायला सुरूवात केली. घरात गाणारे असे कुणीच नव्हते. अभ्यासापेक्षा गाण्यात जास्त रस असलेल्या सुलोचनाबाईंकडे कोणतेही गाणे पटकन उचलण्याची हातोटी होती. परकरातली ही मुलगी काय गाणार? असा प्रश्न कोणत्याही संगीतकाराच्या नजरेत दिसला आणि त्याने गाऊन दाखव असे सांगितले, की त्या म्हणायच्या ‘तुमचेच गाणे म्हणते, चला.’ (म्हणजे गाणे पाठ करून म्हटल्याचा आरोप नको!) अगदी लहान वयात गोड गळ्याच्या सुलोचनाबाईंना भरपूर निमंत्रणे येऊ लागली. त्यांनी पार्श्वगायन करायला सुरूवात केली, तेव्हा लता मंगेशकर आणि आशा भोसले ही स्वरांची वादळे यायची होती. मिळेल त्या गाण्याचे सोने करण्याची अभिजात क्षमता असलेल्या सुलोचनाबाईंनी १९४९ ते ७५ या काळात किमान सत्तरहून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली. यामुळेच वसंत पवार यांनी त्यांच्या गळ्यातून लावणीचा आविष्कार घडवला आणि महाराष्ट्राला आपला असा एक खास ठसकेबाज आणि तरीही शालीन असा आवाज गवसला.
लावणी हा मराठी माणसाचा एक हळवा कोपरा. महाराष्ट्राच्या लोकसंगीतात लावणीने जे घडवले, ते अन्य फार कमी संगीतप्रकारांनी घडवले. शब्दप्रधान गायकीतील भावगीतांची परंपरा याच लावणीतून पुढे आली असली, तरीही लावणीचा बाज मात्र कमी झाला नाही. तिची लोकप्रियताही कमी झाली नाही आणि रसिकांच्या मनातील तिच्या स्थानालाही धक्का पोहोचला नाही. याचे खरे कारण सुलोचना चव्हाण यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात लावणीचा जागर सतत होत राहिला. ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘देव माझा मल्हारी’ अशा कितीतरी लावण्या रसिकांच्या ओठांवर सतत तरळत होत्या.
मराठीपणाचा हा झेंडा सतत फडकवत ठेवणाऱ्या या लावणीसम्राज्ञीला पती श्यामराव चव्हाण यांच्या पाठिंब्यामुळेच आपले सारे आयुष्य अतिशय समाधानात आणि तोऱ्यात व्यतीत करता आले, याचे समाधान आहे. ‘माझं गाणं, माझं जगणं’ या त्यांच्या आत्मचरित्रातील कितीतरी आठवणी त्यांच्या या संपन्न जगण्याचा पुरावा देतात. शासनाचा पुरस्कार, ‘मल्हारी मरतड’ चित्रपटासाठी सवरेकृष्ट लावणी गायिकेचा सन्मान, पी. सावळाराम-गंगाजमना पुरस्कार अशा पुरस्कारांच्या यादीत लता मंगेशकर पुरस्काराने मोलाची भर घातली आहे.
Leave a Reply