कवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट.
१५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. शिक्षण अमरावती येथे झाले. बी. ए. ची पदवी त्यांनी विदर्भ महाविद्यालय येथून प्राप्त केली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रातून ते लिखाण करू लागले. तरुणभारत, लोकसत्ता इ. वृत्तपत्रातून वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिलं. ‘बहुमत’ या साप्ताहिकाचे ते काही वर्ष संपादकही होते.
वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली आणि १९६१ मध्ये ‘रुपगंधा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून महाराष्ट्रात ते नावाजले जाऊ लागले. त्यानंतर ‘एल्गार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ इ. संग्रह प्रकाशित झाल्यावर तर भटांचा वेगळा रंग सगळ्यांनाच भावला. मृदू आणि हळूवार असणारी त्यांची कविता अनेकवेळा बाणाच्या टोकासारखी तीक्ष्ण आणि बोचरी अशी औपरोधिक बनत असे, त्यावेळी कवी म्हणून असलेल्या त्यांच्या कोमल मनाचे एक टोक तर समाजातील लाचारी, स्वार्थ, ढोंगीपणा यावर प्रहार करणारे मनाचे दुसरे टोक आपल्याला दिसते. खालील त्यांच्या गीतातून हीच प्रचिती जागोजाग येते. ‘चल उठ रे मुकुंदा’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ यातून दिसणारा निर्मळ भक्तिभाव, तर ‘मलमली तारुण्य माझे’ किवा ‘मालवून टाक दीप’ या गाण्यातून उमलणारा शृंगार किवा विरहाची भावना याच्या अगदी उलट ‘पूर्तता माझ्या व्यथेची’ वा ‘उषःकाल होता होता कालरात्र झाली’ या त्यांच्या शब्दातून उद्धृत होणारी समाजातील मूल्यहीनता आपल्या नजरेसमोर येते आणि सुरेश भटांच्या अनेक पदरी, अनेक रंगी असलेल्या प्रतिभेतून त्याचं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर स्पष्ट होत जातं.
‘गझल’ हा काव्यप्रकार सुरेश भटांमुळे सामान्य रसिकांमध्ये लोकप्रिय झाला. ‘ झल’ या रचनाबंधासाठी त्यांनी जे योगदान दिले ते साहित्य, काव्य परंपरेत मोलाचे ठरले आहे. फारसी आणि उर्दूचा स्वीकार करणारी अशी भटांची गझल आहे. ‘काफला’ हा गझलांचा संपादित असा संग्रह तर ‘सुरेश भट यांची निवडक कविता’ हा त्यांचा शिरीष पै यांनी संपादित केलेला संग्रह.
या गझल सम्राटाचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाले.
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट (15-Mar-2017)
मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट (15-Apr-2019)
## Bhat, Suresh
Leave a Reply