घाटगे, विष्णु माधव

विष्णु माधव घाटगे हे भारताला हवाई क्षेत्रामधील स्वयंसिध्दतेकडे घेवून जाणारे एक महान वैज्ञानिक, उद्योगपती, व कारखानदार अशा तिहेरी भुमिकेतील तारणहार होते. या तारणहार म्हणण्याला कारणही तसेच आहे, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विमान निर्मीतीसारख्या मोठ्या, किचकट, व आधुनिकतेबरोबरच भक्कम आर्थिक पाठबळ लागणार्‍या उद्योगधंद्यात उतरायला कोणीच धजत नव्हते. तेव्हा या प्रचंड उर्जेच्या, व व्यावसायिक कौशल्यांनी ओतप्रोत भरलेल्या उद्योजकाने कुणाच्याही मदतीशिवाय या पठडीबाहेरच्या, व आव्हानात्मक क्षेत्रात उडी मारली होती. घाटगे यांनी त्यांच्या स्वप्नवत कारकीर्दीमध्ये अनेक प्रकारची विमाने बनविली व विकलीसुध्दा. आपल्या डोक्यातही येणार नाही अशा कितीतरी दैनंदिन गोष्टी विमानाच्या साहाय्याने सुसह्य व गतिमान कशा करता येवू शकतात हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले होते. जसे पिकांवर औषधे व किटकनाशके फवारण्यासाठी कृषक हे चालवण्यास अतिशय सहज सोपे, व खिशाला परवडणारे विमान त्यांनी सामान्य शेतकर्‍यांसाठी बनविले होते. घाटगे यांनी ज्याप्रमाणे बाहेरच्या देशांना भारत कशा प्रकारे राखेतून सुरूवात करून आपल्या कर्तुत्वाची सुंदर व कल्पक रांगोळी निर्माण करू शकतो हे दाखवून दिले होते, त्याचप्रमाणे त्यांनी असंख्य उद्योजक होऊ पाहणार्‍या नव-तरूणांना प्रेरणा व आत्मविश्वासाचे तेज दिले होते. गुलाम गिरीची पुटं कधीच झाडली गेली होती व एक नव तंत्रज्ञानाचं, व विज्ञानाचं लख्ख आभाळ भारताला साद घालत होतं, या सादेला सर्वप्रथम प्रतिसाद दिला तो या स्वप्नाळू, परंतु बेहद निश्चयी मराठमोळ्या तरूणाने.
[…]