मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका तसंच हिंदी सिनेसृष्टीतील गुणी कलावंत म्हणून उपेंद्र लिमये हे नाव आपल्याला परिचित आहे. ८ मार्च १९७४ रोजी पुणे येथे जन्मलेल्या उपेंद्र लिमयेंना लहानपणापासूनच अभिनयकलेची आवड होती. १९८७ साली पुण्याच्या ललित कला केंद्रातून अभिनयाचं सास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यानंतर मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम विषयातून पदव्युत्तर शिक्षण
पूर्ण केले. १९९० नंतर उपेंद्र लिमयेंनी अनेक एकपात्री व एकांकीकांच्या माध्यमातून अभिनय साकारत अनेक दिग्गज कलाकारां कडून वाव्हा मिळवली.कोण म्हणतो टक्का दिला हे नाटकं तर कमालीचे गाजले.अतिरेकी, आम्ही जातो आमुच्या गावा, जळाली तुझी प्रीत, नियतीच्या बैलाला,येथे चेष्टेची मस्करी होते यासारख्या नाटकामधून अभिनय करत त्यांनी आई शप्पथ, एके-४७ ,न दिलेला नकार, नियतीच्या बैलाला, सखी माझी लावणी ,सती अश्या नाटकांचं दिग्दर्शनसुध्दा केलं.
१९९४ रोजी प्रदर्शित झालेल्या मुक्ता या चित्रपटात कार्यकर्ताच्या भूमिकेद्वारा रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. आणि त्यानंतर बांगरवाडी, कथा दोन गणपतरावांची, सरकारनामा, कैरी, ध्यासपर्व, सावरखेड:एक गाव, जत्रा, ब्लाइंड गेम, मेड इन चायना, उरुस, मी सिंधुताई सपकाळ, धूसर, महागुरू, तुह्या धर्म कोनचा, बदाम राणी गुलाम चोर, चिरगुट, धग, नगरसेवक अशा चित्रपटातून प्रमुख व मध्यवर्ती भुमिका साकारल्या. २००८ साली प्रदर्शित झालेल्या जोगवा चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या ताय्यपा या व्यक्तीरेखेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं; चांदनी बार, पेज थ्री, डार्लिंग, ट्राफिक सिग्नल, काँट्रॅक्ट, माय नेम इज ३४०, शिवा यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये सहनायक किंवा चरित्र भूमिका साकारत आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडले. तर दक्ण भारतीय चित्रपटात देखील उपेंद्र लिमयेंनी वैविध्यपूर्ण भुमिका साकारल्या आहेत.
किमयागार, दामिनी, नकाब,भाग्यविधाता, या गोजिरवाण्या घरात, या सुखांनो या, समांतर या दुरचित्रवाणी मालिकांमधुन वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारल्या.
त्यांच्या कार्यासाठी आणि अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनं सन्मानित देखील करण्यात आलं आहे.उपेंद्र लिमयेंना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नाट्यगौरव पुरस्कार, कालनिर्णय पुरस्कार, हमलोग पुरस्कार, २००६ सालचा राष्ट्रीय रत्न पुरस्कार, बाबुराव पेंटर पुरस्कार, संकृती कलादर्पण पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कारानं व राज्य शासनाच्या पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं असून वर्ष २०१० सालचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार आणि निनाद पुरस्कारांनं गौरवण्यात आलं आहे.
Leave a Reply