![default-photo-01-100](https://www.marathisrushti.com/profiles/wp-content/uploads/sites/2/2010/02/default-photo-01-100.jpg)
ग्रामीण भाषा व आपल्या अंगणाबाहेरचे जग न अनुभवता देखील स्वत:च्या लेखणीने परिपुर्णता व प्रगल्भतेचा सुरेल संगम साधलेला दिसतो अश्या साहित्यिक म्हणजे उर्मीला पवार. त्यांचा जन्म ७ मे १९४५ रोजी झाला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले बालपण व्यतीत केले. एम.ए चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लेखनाला सुरुवात केली.
“सहावं बोट” हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८८मध्ये प्रकाशित झाला. “दलितांचा इतिहास व सद्यस्थितीचा अभ्यास”, “उदान” या पाली भाषेतल्या ’तिपिटक सुत्तपीटक खुद्दकणिकाय उदान’ या मूळ ग्रंथाचा अनुवाद तसेच बौद्ध धम्मग्रंथांचा मराठी अनुवाद, अशा प्रकारचे लेखनही ऊर्मिला पवार यांनी केले आहे. त्याशिवाय कथा, समीक्षा, कविता, एकांकीका, प्रवासवर्णन यासोबतच वैचारिक लेखन देखील उर्मिला पवार यांनी केले असून “चौथी भिंत”, “हातचा एक” हे कथासंग्रह “मॉरिशस-एक प्रवास” हे प्रवासावर आधारीत पुस्तक, “आम्हीही इतिहास घडवला : आंबेडकरी चलवळीत स्त्रियांचा सहभाग”-(सहलेखिका मीनाक्षी मून) व “दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य असे वैचारिक लेखन करुन साहित्य वर्तुळात ठसा उमटवला. ऊर्मिला पवार यांच्या कथा, आत्मकथनाची इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतरे झाली आहेत.
“आयदान” या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचे व सामान्य रसिकांचे अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. लहानपणी त्यांनी जगलेले जीवन, व त्यांच्यासारख्याच हजारो स्वप्नाळू ग्रामीण कुमारिकांचे वास्तवदर्शी जीवन, व त्यांची स्वप्ने, महत्वाकांक्षा, भावविश्व, व समाजाकडून असलेल्या रास्त अपेक्षा या आत्मचरित्रात उत्कटपणे उमटल्या आहेत. याखेरीज, ग्रामीण संस्कृतीचे महत्वाचे पापुद्रे हळुवार उलगडणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली व प्रकाशित केलेली आहेत. मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा “बलुतं ते आयदान” अशीच केली जाते.
उर्मीला पवार यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये २००४सालचा “प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार”, नाशिकच्या समाज प्रबोधन संस्थेचा ‘प्रबोधनमित्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
१३ व १४ जानेवारी २०१३ रोजी धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उर्मिला पवार अध्यक्षा होत्या.
Leave a Reply