भारतीय आधुनिक कलाविश्वात वासुदेव गायतोंडे यांचा एक अग्रगण्य ‘अमूर्तवादी चित्रकार‘ म्हणून लौकिक आहे. अमूर्तवादी चित्रशैलीशी एकनिष्ठ राहणारा आत्मनिष्ठ चित्रकार म्हणून व्ही. एस. गायतोंडे यांना विशेष मान्यता आहे.
गायतोंडे यांचा जन्म १९२४ साली झाला. मूळचे गोव्याचे असलेल्या गायतोंडे यांच्या बालपणाची काही वर्ष गोव्यातील एका छोटया खेडयात गेली. त्यानंतर त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या चिकित्सक हायस्कुलमध्ये झाले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी एका खासगी आर्टस्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलं व त्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातून चित्रकलेंचं शिक्षण पूर्ण केलं जे.जे. स्कूल मध्ये काही काळ ‘फेलो‘ म्हणून काम केल्यावर १९६४ साली त्यांना रॉकफेलर‘ शिष्यवृत्ती मिळाली व ते न्यूयॉर्क इथे गेले. बोस्टन, शिकॅगो, सानफ्रान्सिको व इतर अमेरिकेतील चित्रशैलीचा त्यांनी परिचय करुन घेतला. त्यानंतर जपानच्या भेटीत तेथील ‘झेन‘ तत्वज्ञानाने ते प्रभावित झाले. १९७२ साली ते भारतात परतले व त्यानंतर अखेरपर्यत त्यांचं वास्तव्य दिल्लीतच राहिलं.
लहानपणी गावातल्या देवळातील भिंतींवरील चित्रांमुळे त्यांना चित्रकलेबद्दल आकर्षण निर्माण झालं. जे. जे. मध्ये असताना त्यांनी लघुचित्रांचा विशेष सराव केला. पाश्चात्य कलेतील रंग व रचना यांबद्दल आकर्षण असलेले गायतोंडे विशेषतः स्विस चित्रकार पॉल क्ले यांच्या चित्रशैलीने प्रभावित झाले होते. १९५० पर्यंत मुख्यतः आकृतिप्रधान चित्रे काढणार्या गायतोंडेंची नंतरची वाटचाल अमूर्त चित्रशैलीच्या अंगाने झाली. काही काळ पॉल क्लेच्या प्रभावाखालील चित्रं काढल्यावर त्यांची स्वतंत्र शैली विकसित केली.
सुलेखनकारिक आकार तसेच चित्रलिपीतील आकारातून रंग, पोत , अवकाश , या शुध्द घटकांचा वापर हे त्यांच्या वित्रकृतीचं वैशिष्टय मानलं जातं. या घटकांना आधारभूत मानून आध्यात्मिक अनुभवाचा शोध घेणारे आत्मनिष्ठ कलाकार म्हणून त्यांना मान्यता मिळाली. रंग व रंगलेपन हा त्यांच्या चित्रातील प्रमुख घटक राहिला. ‘रोलर‘ किंवा ‘पेंटिग नाइफ‘चा वापर करणार्या गायतोंडेनी मात्र तंत्राला अती महत्व दिलं नाही. रंगांचाही ते मर्यादित वापर करीत. रंग विलेपनातून पृष्ठभागावर विविध प्रस्तर निर्माण करुन अवकाशाच्या विविध खोलींचा भास निर्माण करणं, हे त्यांच्या चित्रकृतीचं ठळक वैशिष्टय ठरलं.
गायतोंडे यांच्या चित्रांची भारतात व परदेशांतही अनेक प्रदर्शनं झाली. ‘यंग एशियन आर्टिस्टस‘ प्रदर्शनातील त्यांच्या चित्राला पारितोषिक लाभलं होतं. १९७१ साली भारत सरकाने त्यांचा ‘पद्मश्री‘ किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांची काही मोजकी चित्रं म्युझियम ऑफ आर्ट मध्ये ठेवण्यात आली आहेत. तसेच सुनील कळदाते या लघुचित्रपटाकाराने त्यांच्या कार्यावर एक लघुचित्रपटही निर्मिला आहे.
चित्रमाध्यमाला आत्मशोधनाची प्रक्रिया समजून कलाविश्वात आपलं योगदान करणार्या गायतोंडे यांचं १० ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.
Leave a Reply