एखादा जन्मजात, अस्सल कलावंत जन्माला येतो आणि आपल्या प्रतिभेने, बुद्धिने आपण वावरत असलेले क्षेत्र समृद्ध करून उंचीवर नेऊन ठेवतो, ज्याचा आनंद त्या कलाकारालाही होतो आणि रसिकांनाही होतो. अशाच जातकुळीचा चित्रपटसृष्टीतला एक श्रेष्ठ कलावंत म्हणजे मास्टर विनायक.
मास्टर विनायकांचा जन्म १९ जानेवारी १९०६ ला कोल्हापूर येथे झाला. मास्टर विनायक आणि चित्रपट हे चित्रपटसृष्टीत एक समीकरणचं झालेलं होतं. विनायकरावांच्या ठिकाणी विविध कलागुण एकत्रित झालेले असल्यामुळे दिग्दर्शक या नात्याने त्यांची कारकीर्द फक्त दहा-बारा वर्षांची असूनही त्यांनी कल्पनेच्या भरारीतून जाणार्या मराठी चित्रपटाला बाहेर काढून सामाजिक जाणिवेच्या वास्तवावर उभे केले.
गंभीर, सामाजिक समस्यांना स्पर्श करणारे आणि कारुण्याने ओंथबलेले ‘माझे बाळ’, ‘छाया’ यासारखे चित्रपट अतिशय भावनिक स्तरावर हाताळले तर ‘ब्रह्मचारी’, ‘सरकारी पाहुणे’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती करून विनोदप्रधान चित्रपटांद्वारा रसिकांना मनमुराद हसवले. करूण आणि हास्य या परस्परविरोधी असलेल्या दोन्ही भावनांना स्वतःची पकड असलेला दिग्दर्शक या नात्याने भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. उपहास, विडंबन, उपरोध, विनोद आणि विनोदी कोट्या या सगळ्यांचा उपयोग करून त्यांनी उत्कृष्ट आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली.
मराठी रंगभूमीवर खाडिलकर, गडकरी, वरेरकर, देवल यांनी विविध प्रयोग करून एक नावीन्य निर्माण केले होते. त्या नावीन्यपूर्ण गोष्टींचा विनायकरावांनी आपल्या चित्रपटांमध्ये सहज समावेश करून घेतला. त्यांनी अनेक चित्रपटातून स्वतः भूमिका केल्या. त्यापैकी ‘मायामच्छिंद्र’, ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’, ‘माझे बाळ’, ‘अमृत’, ‘संगम’, ‘अर्धांगी’, ‘घर की रानी’, ‘लंपडाव’, ‘ब्रँडी की बोतल’, ‘ब्रह्मचारी’, ‘ज्वाला’, ‘धर्मवीर’, ‘छाया’, ‘भिकारन’, ‘निगाहए नफरत’, ‘विलासी विश्व’, ‘आकाशवाणी’, ‘सैरंध्री’, ‘सिहगड’, ‘अयोध्येचा राजा’, ‘जलती निशानी’हे त्यांचे गाजलेले चित्रपट. तसेच दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक चित्रपट समाजाला दिले. ‘मंदिर’, ‘जीवनयात्रा’, ‘सुभद्रा’, ‘बडी माँ’, ‘माझे बाळ’, ‘सरकारी पाहुणे’, ‘अमृत’, ‘अर्धांगी’, ‘घर की कहानी’, ‘लग्न पहावे करून’, ‘ब्रँडी की बोतल’, ‘देवता, ‘ब्रह्मचारी’, ‘ज्वाला’, ‘धर्मवीर’, ‘छाया’या सर्व चित्रपटातून एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विनायकराव साकार झालेले दिसतात. आपल्या दिग्दर्शनातून त्यांनी मराठी चित्रपटांना आत्म्याचे, बुद्धिचे सौंदर्य आणि सामर्थ्य दिले आणि म्हणूनच १९३६ पासून पुढे त्यांनी मराठी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. सुरुवातीला बालकलाकार काम करणारी आणि पुढे नायिका नंदा म्हणून गाजलेली अभिनेत्री ही मास्टर विनायकांची कन्या आहे.
मास्टर विनायकांचे १९ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे निधन झाले.
मास्टर विनायक यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मास्टर विनायक (19-Jan-2017)
मराठी सामाजिक बोलपटांचे आद्य प्रवर्तक मास्टर विनायक (19-Jan-2018)
मराठी सामाजिक बोलपटांचे आद्य प्रवर्तक मास्टर विनायक (19-Aug-2021)
## Master Vinayak
Leave a Reply