जन्म- सप्टेंबर ११, १८९५ मृत्यू- नोव्हेंबर १५, १९८२
विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये ‘छोडो भारत’ आंदोलनात झाले. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.
थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी. आजोबा आणि आईकडून विनोबांना बालपणापासूनच धर्मपरायणतेचे संस्कार मिळाले. वडिलांना नोकरी निमित्त बडोद्याला रहावं लागल्यामुळे त्यांचं माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईला निघाले; पण मध्येच सुरत येथे उतरून आई-वडिलांना न सांगता ते वाराणसीला आले. विनोबांना दोन गोष्टींचे खूप आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक. वाराणसी येथील हिंदू विश्वविद्यालयात गांधीजींचे भाषण झाले. या भाषणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला की, हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती या दोन्हींच्या प्रेरणा त्यांना गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात आढळल्या. पुढे त्यांनी गांधीजींशी पत्रव्यवहार करुन त्यांची “कोयरब” आश्रमात भेट घेतली आणि इथूनच नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करुन जीवनसाधना सुरु केली. मध्ये गांधीजींच्या परवानगीने एक वर्षाची रजा घेऊन वाई येथे त्यांनी वेदान्ताचे अध्ययन केले. १९२१ साली जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्धा येथे काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्याला केली.
भूदानयात्रा सोडल्यास विनोबांनी आपले समग्र आयुष्य तपश्चर्या करीत वर्धा येथेच घालविले. दिवसातले सात – आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतीकाम अशी कामे ते करीत. प्रत्येक माणसाने रोज नेमाने शरीरश्रम करावेत, असा त्यांचा सिद्धांत आहे. शरीर श्रमाबरोबरच त्यांनी मानसिक, अध्यात्मिक साधनाही प्रखरतेने केली. १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारावास भोगला. १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या आंदोलनात गांधीनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. अध्यात्मिक साधनेले वाहून घेतलेला “शत्रूमित्रसमभावी‘ तपस्वी” मनुष्य सत्याग्रहाला आवश्यक म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली. १९३२ च्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांनी धुळे येथील कारागृहात शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहातच त्यांनी दिली. गांधीजींच्या हत्येनंतर त्यांचे रचनात्मक कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी अनुयायांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. या समाजाच्या शिवरामपल्ली येथील तिसर्या अधिवेशनानंतर १५ एप्रिल १९५१ रोजी साम्यवादी हिंसात्मक चळवळींनी त्रस्त झालेल्या तेलंगणात शांतीचा संदेश पोहोचविण्याच्या हेतूने विनोबीजींनी पदयात्रा सुरु केली. या पदयात्रेतूनच भूदान चळवळीचा आकस्मिक रितीने प्रारंभ झाला. शांतियात्रेचे भूदानयात्रेत रूपांतर झाले. नैतिक संदेशाला व्यावहारिक कृतीची जोड मिळाली.
१९६७ पर्यंत भूदानात मिळालेल्या जमिनीचा आकडा ४३ लक्ष एकरपर्यंत पोहोचला. ह्या आंदोलनाचा व्याप वाढत गेला. भूदानातून प्रेमदान, बुद्धिदान, श्रमदान, संपत्तिदान व जीवनदान असे पंचदान आंदोलन निर्माण झाले. लोकांचे हृदयपरिवर्तन करणे, त्यांची जीवनदृष्टी बदलणे आणि त्या अनुरोधाने समाजाची पुनर्रचना करणे, असे भूदानाचे तत्त्व विनोबाजींनी मांडले. अनेकांनी या आंदोलनाचा उल्लेख विसाव्या शतकातील एक मोठी अहिसंक क्रांती, असा केला आहे. विनोबाजींनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे. त्यामध्ये “गीताई”, “मधुकर गीताप्रवचन”, “इशाव्यासवृत्ती”, “स्वराज्यशास्त्र” आणि “सर्वोदयी विचार”, “ज्ञानदेव चिंतनिका” इ. पुस्तकाचा समावेश होतो. विनोबाजींनी प्रायोपवेशनाच्याद्वारे आपला देहत्याग केला. विनोबाजी आयुष्यभर निरपवाद अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते राहिले. हे विज्ञानयुग आहे, या विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड घातली, तर मनुष्यजातीचा उद्धार होईल, ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
## Vinoba Bhave
Leave a Reply