घाटगे, विष्णु माधव

विष्णु माधव घाटगे हे भारताला हवाई क्षेत्रामधील स्वयंसिध्दतेकडे घेवून जाणारे एक महान वैज्ञानिक, उद्योगपती, व कारखानदार अशा तिहेरी भुमिकेतील तारणहार होते. या तारणहार म्हणण्याला कारणही तसेच आहे, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विमान निर्मीतीसारख्या मोठ्या, किचकट, व आधुनिकतेबरोबरच भक्कम आर्थिक पाठबळ लागणार्‍या उद्योगधंद्यात उतरायला कोणीच धजत नव्हते. तेव्हा या प्रचंड उर्जेच्या, व व्यावसायिक कौशल्यांनी ओतप्रोत भरलेल्या उद्योजकाने कुणाच्याही मदतीशिवाय या पठडीबाहेरच्या, व आव्हानात्मक क्षेत्रात उडी मारली होती. घाटगे यांनी त्यांच्या स्वप्नवत कारकीर्दीमध्ये अनेक प्रकारची विमाने बनविली व विकलीसुध्दा. आपल्या डोक्यातही येणार नाही अशा कितीतरी दैनंदिन गोष्टी विमानाच्या साहाय्याने सुसह्य व गतिमान कशा करता येवू शकतात हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले होते. जसे पिकांवर औषधे व किटकनाशके फवारण्यासाठी कृषक हे चालवण्यास अतिशय सहज सोपे, व खिशाला परवडणारे विमान त्यांनी सामान्य शेतकर्‍यांसाठी बनविले होते. घाटगे यांनी ज्याप्रमाणे बाहेरच्या देशांना भारत कशा प्रकारे राखेतून सुरूवात करून आपल्या कर्तुत्वाची सुंदर व कल्पक रांगोळी निर्माण करू शकतो हे दाखवून दिले होते, त्याचप्रमाणे त्यांनी असंख्य उद्योजक होऊ पाहणार्‍या नव-तरूणांना प्रेरणा व आत्मविश्वासाचे तेज दिले होते. गुलाम गिरीची पुटं कधीच झाडली गेली होती व एक नव तंत्रज्ञानाचं, व विज्ञानाचं लख्ख आभाळ भारताला साद घालत होतं, या सादेला सर्वप्रथम प्रतिसाद दिला तो या स्वप्नाळू, परंतु बेहद निश्चयी मराठमोळ्या तरूणाने.

घाटगे यांनी एरोडायनॅमिक्स या विषयामध्ये खास प्राविण्य मिळविले होते. सैनिक घेवून जाणार्‍या ग्लायडरचे डिझाइन, विकास आणि निर्मीती त्यांनी केली. एच टी २ या जातीचे प्रशिक्षणास उपयुक्त असणारे विमान, दोन आसने असणारे व विमानविद्या आत्मसात करण्यास अतिशय सोपे व उपयुक्त असे पुष्पक विमान, किरण हे त्यांच्या उत्तुंग प्रतिभाशक्तीचे द्योतक असलेले शिकाऊ विमान अश्या अनेक विमानांची निर्मीती व विक्री करून त्यांनी भारतात विमान तंत्रज्ञान आणले, व रूजवले. जुन्या पंखाच्या विमानांमध्येच त्यांना रस होता असे नाही तर त्या वेळी त्यांनी पंचवीसशे पौंडाचा दट्व्या निर्माण करू शकणारे, जेट इंजिन बनवून भारताला गरीब व आदिमानवासमान म्हणून हिणवणार्‍या शेजारी देशांमध्ये एकच खळबळ उडवून दिली होती.

अशा प्रकारे भारताला हवाई क्षेत्रामधे स्वैर गरूडभरारी मारण्याचं बळ व सामर्थ्य पुरविणार्‍या, व त्यावेळच्या युवकांना नव्या क्षितीजाची दालनं खुली करणार्‍या घाटगेंचा, भारत सरकारतर्फे “पद्मश्री” हा खिताब देवून यथोचित सन्मान करण्यात आला

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*