योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे

ज्येष्ठ योगाचार्य

ठाणे येथे योगप्रसाराची सुरुवात करुन गेली ४५ वर्षे याच कामासाठी सर्वस्व अर्पण करणारे ज्येष्ठ योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे हे ठाणे शहराचे एक भूषण होते.

मूळचे नाशिकचे असलेले अण्णा १९६० च्या दशकात ठाण्यात वास्तव्याला आले. ठाण्याच्या एका गल्लीत सुरू झालेली ही योगाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेला.  सर्वसामान्य माणूस ते अट्टल कैदी, मतिमंद अशा समाजातील विविध स्तरांतील वर्गांना त्यांनी योगाचे प्रशिक्षण दिले.

२६ जानेवारी १९६५ रोजी त्यांनी घंटाळी मित्र मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह अण्णांनी योगसाधनेची चळवळ ठाणे शहरात उभी केली. घंटाळी मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला.

योग साधनेतून अण्णांनी हजारो कार्यकर्ते घडविले. शिस्तबध्द आणि नियोजन पूर्वक मंडळाचा कारभार चालला पाहिजे, असा दंडक त्यांनी घालून दिला होता. मात्र ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्रोते आणि कार्यकत्यांची वाणवा निर्माण झाल्याने त्यांनी हा उत्सव जड अंतकरणाने बंद केला.

पश्चिम रेल्वेत नोकरी करणारे अण्णा यांनी योगसाधनेचे व्रत घेतले होते.  त्यांनी भरविलेल्या योगशिबिरांचा उंची वृद्धी, स्मृती संवर्धन, स्थूलता निर्मूलन, रक्तदाब नियंत्रण, प्रदूषण प्रतिबंधक मेधा संस्कार, आनंद साधना, उदरव्याधी निवारण, कंठस्थ ग्रंथी स्वास्थ्य, अस्थमा निवारण अशा अनेक कारणांसाठी १ लाखांहून अधिक साधकांना फायदा झाला. त्यांनी घेतलेल्या योगसंमेलनामध्ये २० हजारांवर प्रतिनिधींनी भाग घेतला. योग प्रशिक्षण शिबिरातून आजवर दोन हजारांवर योगशिक्षक तयार झाले. त्यातील १३ जण ठाणे कारागृहातील कैदी होते.

ठाण्याच्या कारागृहातील कैद्यासाठी त्यांनी योगाचे वर्ग घेतले. या वर्गात येणार्‍या अट्टल कैद्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडले. १९७९ मध्ये ठाणे कारागृहात त्यांनी राबवलेला वाल्याचा वाल्मिकी करणारा प्रकल्प आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला. मुंगेरच्या बिहार योग विद्यालयाने बिहारमधल्या आठ तुरुंगातील १६५ कैद्यांना प्रशिक्षित योगशिक्षक म्हणून घडविले. या प्रकल्पावरील शोधनिबंधास १९८८ साली बँकॉक येथे भरलेल्या जागतिक योग परिषदेत रौप्यपदक प्राप्त झाले.

घंटाळी मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आयोजित केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक मैफलींनी ठाणेकर समृध्द झाले. प्रबोधनात्मक कार्यक्रमांना ७० हजारांवर श्रोत्यांनी उपस्थित राहून दाद दिली.

योगविषयक १५ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. परदेशातही त्यांनी योगकार्यार्थ दौरे केले होते.

सन १९७८ मध्ये त्यांना स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी ‘योगाचार्य’ ही पदवी बहाल केली. मुंगेर येथे भरलेल्या जागतिक योग संमेलनात बिहार स्कूल ऑफ योगाने अण्णांना ‘सुवर्णयोगी’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता.

१९७८ पासून २०१० पर्यंत त्यांनी १७ योग संमेलनांचे आयोजन केले. २००२ च्या योग महोत्सवात स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी अण्णांना कर्मसंन्यासाची दीक्षा देऊन त्यांचे स्वामी सत्यकर्मानंद असं नामकरण केलं.

२४ ऑगस्ट २०१९ रोजी अण्णा व्यवहारे यांचे अल्पशा आजाराने ठाणे येथे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.

आंतरराष्ट्रीय दर्जाची निवासी योगप्रबोधिनी सुरू करणे हे त्यांचे स्वप्न होते, जे अपूर्ण राहिले.

## Yogacharya Shrikrushna alias Anna Vyavahare
## Ghantali Mitra Mandal, Thane

(Last Updated on : 25 August 2019)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*