आजचा विषय कढी भाग दोन

आपल्या रोजच्या आयुष्यात कढी वरच्या किती म्हणी आहेत. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, शिळ्या कढीला उत, दुसर्यारची कढी न धावू धावू वाढी, प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो,ताज्या ताकामध्ये डाळीचे पीठ एकजीव मिसळायचे, त्यात मीठ, चवीपुरती साखर टाकायची ( 🙂 )आणि फोडणी करतांना जिरे, मोहरी, आले, कढीपत्ता टाकायचा आणि त्याला मस्त उकळी आणायची. काही घरांमध्ये यात मिरची आणि लसणाची फोडणी पण असते तर काही टिकाणी यात हळद घालतात. कृती जरी साधी सरळ असली तरी कढी बनवणे जरा निगुतीचे काम आहे. बेसन आणि ताकाचे एकजीव मिश्रण करणे अतिशय महत्वाचे आहे. नाही तर कढी फुटते. म्हणजे पाणी आणि दही वेगळे होते. दुसरे म्हणजे तिला उकळी येईपर्यंत त्याला हलवत राहावे लागते. पण हे सगळे कष्ट अगदी सार्थकी लागतात जेंव्हा मस्त गरम कढीची वाटी तोंडाला लागते आणि संपूनच खाली ठेवली जाते. कढी खिचडी, किंवा नुसता भात याबरोबरच पुरणाच्या पोळीबरोबर पण केली जाते.

कढी म्हणलं कि आपल्याला ताक आणि बेसन घालून बनवलेली कढी असं जरी समीकरण माहित असलं तरी त्याला अपवाद सोलकढीचा आणि सिंधी कढीचा! त्याची तर एक मज्जाच आहे. सिंधी कढी, वेगवेगळ्या भाज्या उकडून त्या दही किंवा टमाटे प्युरी यात बेसन घालून बनवली जाते. आंब्याची कढी! पिकलेला आंबा आणि दही याची कढी. एक मोठा आंबा घेऊन तो उकडायचा. या कढीत जो मसाला घातलेला आहे त्यासाठी: ओले खोबरे, मेथी दाणे, थोडी लाल मिरची, जिरे, चना डाळ, तव्यावर भाजून घ्यायचे आणि त्याची पूड बनवायची. आता आंब्याची प्युरी बनवून त्यात ताक घालून एकजीव मिश्रण बनवायचे. या मिश्रणात मसाले, मीठ, घालून मंद आचेवर वाफ येऊ द्यायची. या कढीला उकळू नका असे म्हणले आहे. नंतर या कढीवर वरून फोडणी द्यायची आणि मस्त भातासोबत वाढायची. वाचून तरी छान वाटतंय. आंबा मिळाला तर नक्कीच करून पाहणार आहे मी हि कढी! आता हे एवढ कढीची माहिती वाचल्यावर जर तुम्हाला कढी खावीशी वाटत असेल तर तुम्हाला ती बनवावी लागेल… नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात!
अजून काही कृती कढीच्या
कढी गोळे
साहित्य : सायीच्या दह्याचे ४-५ भांडी ताक, १ वाटी हरभरा डाळ,आलं, हिरव्या मिरच्या (बारीक पेस्ट करून),पाव चमचा हिंग,१ चमचा जिरे पावडर,कढीलिंब,फोडणीचे साहित्य, डाळीचे पीठ चमचाभर,मीठ,साखर.

कृती :-डाळ प्रथम, धुवून साधारण ४ तास भिजवावी. नंतर रोळीत उपसून ठेवावी. ५ मिनिटांनंतर शक्यतो पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटावी. पण फार बारीक करू नये. वाटून झालेल्या डाळीत मिरचीची पेस्ट किंवा आवडत असल्यास लाल तिखट, हिंग, आले (पेस्ट), हळद, मीठ चवीनुसार घालून एकत्र करून ठेवावे.ताकाला १ चमचा डाळीचे पीठ लावावे. त्यात कढीलिंब, मीठ, आवडत असल्यास साखर, आल्याची पेस्ट घालून कढीचे पातेले गॅसवर ठेवावे. पातेले अर्धे रिकामे असावे. कढी उकळू लागल्यावर वाटलेल्या डाळीचे छोटे गोळे करून कढीत सोडावेत. कढी उकळण्यापूर्वी गोळे टाकल्यास गोळे फुटतात. एक एक करून सर्व गोळे कढीत सोडावेत.नंतर १० मिनिटे बारीक गॅसवर कढी उकळू द्यावी. कढी उतरल्यावर त्यावर तेल, मोहरी, हिंग अशी फोडणी करावी व ती कढीवर घालावी. फोडणीत हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावे. हे गोळे भातात कुस्करून त्यावर फोडणी घालून खाण्याची पद्धत आहे. पोळीबरोबर खाण्यासही चांगले लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बटाट्याची कढी
साहित्य: २५० ग्रॅम बटाटा, १२५ ग्रॅम दही, १ वाटी बेसन (डाळीचे पीठ), चवीप्रमाणे मीठ, हळ्द, धणे, लाल तिखट, आंबट पावडर, जीरे, तूप.
कृती: बटाटे उकडून चिरुन घ्या. तूप गरम करून जीरे व हळद टाका. धणे, लाल तिखट, टाकून परता. बटाटे टाका व २ मिनीटे परता. मीठ व दही डाळीच्या पिठात टाकून, पाणी टाकून थोडा वेळ शिजू द्या. ही कढी लवकर तयार होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*