साहित्य:- ३/४ कप बासमती तांदूळ, ३/४ कप मेथीची पाने, ३/४ कप कांदा, पातळ उभा चिरून, २ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून, १/२ कप मक्याचे दाणे, उकडून,१ टिस्पून किसलेले आले, ३ टेस्पून तेल, ३/४ कप दही, २ तमाल पत्र, ४ लवंगा, २ वेलची, दिड कप पाणी, चवीपुरते मिठ, १ टेस्पून तूप, चिमूटभर कसूरी मेथी, पूड करून घ्यावी,थोडी कोथिंबीर, सजावटीसाठी.
कृती:- मेथी साफ करण्यासाठी, बारीक चिरून १/२ तास मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवावी. बासमती तांदूळ धुवून, पाण्यात २० मिनीटे भिजवून ठेवावा. धुतलेली मेथी पाण्यातून काढून पिळून घ्यावी म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी होईल. भिजवलेले तांदूळही निथळून १० मिनीटे ठेवावे. एका खोलगट पातेल्यात तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, वेलची आणि लवंगा घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालून मिडीयम हाय गॅसवर ५ मिनीटे किंवा लालसर होईस्तोवर परतावे. नंतर त्यात आलं आणि हिरव्या मिरच्या घालून परतावे. आता पिळून घेतलेली मेथी घालून २ मिनीटे परतावे. त्यात घोटून घेतलेले दही घालून ढवळत राहावे. दही घट्टसर झाले कि त्यात उकडलेले कॉर्न घालावे. छान मिक्स करून पाणी घालावे. मीठ घालावे आणि चव पहावी. पाण्याला उकळी येऊ द्यावी. एकदा पाणी उकळू लागले कि त्यात धुतलेले तांदूळ घालावे. मध्यम आचेवर, झाकण न ठेवता तांदूळ शिजू द्यावे. ६० % पर्यंत तांदूळ शिजेपर्यंत झाकण ठेवू नये. नंतर झाकण ठेवून मंद आचेवर तांदूळ पूर्ण शिजू द्यावा. फक्त गरज असेल तेव्हाच हलक्या हाताने भात ढवळावा. खुप जास्तवेळा ढवळू नये, त्यामुळे भाताची शिते तुटतात आणि भात निट बनत नाही. भात व्यवस्थित शिजला कि वरून १ टेस्पून तूप घालावे आणि हलक्या हाताने सर्व्हींग प्लेटमध्ये वाढावा. फ्लेवरसाठी थोडी कसूरी मेथी भुरभूरावी. थोडी कोथिंबीर पेरून सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply