केळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक

निरोगी आरोग्यासाठी नेहमीच आपल्याला ताजी फळे आणि भाज्यांचा योग्य प्रमाणात आपल्या आहारात समावेश करायला आरोग्यतज्ञ सल्ला देतात. फळांमध्ये आणि विविध रंगीबेरंगी भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात विविध फळांचा आणि भाज्यांचा योग्य प्रमाणात समावेश केल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या पोषक घटकाचा लाभ होतो. अर्थात आपण निरोगी आरोग्य जगू शकतो.

आपल्याकडे बारा महिने सहज उपलब्ध असणारे, खायला सोपे आणि मऊ, सर्वांचे आवडते फळ म्हणजे ‘केळी’. आपल्याकडे बहुतेक लोकांना केळी खायला आवडतात. खायला सोपी आणि नरम असल्याने लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वाना केळी खायला आवडतात. केळ्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. केळ्यामध्ये अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, पिष्टमय पदार्थ, कॅल्शिअम, फॉस्फरस असे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. केळ हे अधिक उष्मांक देणारे फळ आहे. केळी खाल्ल्याने शरीराला जास्त ऊर्जा प्राप्त होते. केळ्यामधील नैसर्गिक साखरेमुळे शरीरातील थकवा कमी होऊन उत्साह निर्माण होण्यास मदत होते. म्हणून केळ हे शक्तिवर्धक फळ मानले जाते.

आता आपण केळ्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात :

१) केळ्यामध्ये कॅल्शिअम, लोहाचे प्रमाण अधिक असल्याने नियमित एक केळं खाल्यास हाडांचा ठिसूळपणा म्हणजेच ऑस्टीओपोरॉसीस हा आजार टाळण्यासाठी मदत होते.

२) केळ हे शक्तिवर्धक फळ असल्याने केळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील थकवा कमी होऊन शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त होण्यास मदत होते.

३) केळ्याच्या सेवनाने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी केळ योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते.

४) केळ नियमित योग्य प्रमाणात खाल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. केळ पचायला सोपे असल्याने पोटाशी संबंधित विकार कमी करण्यास मदत होते.

५) जुलाबाचा त्रास होत असल्यास केळ खाणे फायदेशीर ठरते. जुलाबामध्ये शरीरातील ऊर्जा कमी होते अशावेळी केळं खाल्यामुळे शरीरातील थकवा कमी होऊन नवीन ऊर्जा मिळते आणि शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक केळ्यामधून शरीराला मिळतात.

६) केळ्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

७) नियमित योग्य प्रमाणात केळं खाल्याने चयापचयाची क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

८) केळ्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

९) केळ्यामधील पोषक घटकांमुळे शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते. जर कोणी तणावग्रस्त असेल तर त्याने जरूर केळं योग्य प्रमाणात सेवन करावे, जेणेकरून केळ्यामधील तत्वामुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त होते. अर्थात तणावग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होते.

१०) केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व आणि खनिज असल्याने लहान मुलांच्या आहारात केळी योग्य प्रमाणात दिल्यास लहान मुलांचा विकास होण्यास मदत होते.

११) ज्यांना वजन वाढवायचे असल्यास त्यांनी आपल्या आहारात योग्य प्रमाणात केळ्याचा समावेश केल्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

१२) नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांनी व्यायाम केल्यानंतर आपल्या आहारात जरूर केळ्याचा समावेश करावा, जेणेकरून त्यांना नैसर्गिकरित्या पोषक घटक मिळून नवीन ऊर्जा प्राप्त होण्यास मदत होईल.

अशी ही नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढवणारी केळी आपण नियमितपणे योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते. म्हणूनच आपल्याकडे पूर्वापार उपवासाला केळी खाण्याची पद्धत आहे. प्रसादाला पण केळ्याचा मान असतो. कुठल्याही मंगलकार्यात आपण केळ्याचे खांब दरवाजाला बांधायची पद्धत आहे. असे हे बहुगुणी केळं आपल्या आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट करणं, आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरते.

— संकेत प्रसादे

Avatar
About Sanket 7 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*