आजचा विषय केळी भाग दोन

केळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या मध्यभागातून एक दांडा फुटतो. या दांड्याच्या अग्रभागी लाल फुले येतात. या फुलांचेच पुढे केळ्यात रूपांतर होते. केळ्याच्या एका घडात तीनशे ते चारशे केळी तयार होतात. केळ्याच्या फुलाला “केळफूल’ म्हटले जाते. आपल्याकडे व कोकणात केळफुलाची अत्यंत चविष्ट अशी भाजी करतात. आपल्याकडे, कोकणात व दक्षिण भारतात घरोघरी केळीची झाडे आढळून येतात. भारतात अनेक जातींची केळी पाहायला मिळतात. रानात आपोआप उगवणारी रानकेळी, रंगभेदानुसार पिवळ्या सालींची केळी, हिरव्या सालींची केळी आणि लाल सालींची केळी असे काही प्रकार आहेत. वेलची केळी आकाराने लहान असतात. पांढरी जात असलेली वेलची केळी जणू साखरच वाटते. आपल्याकडे माणिक्येकदली, अमृतकदली, चंपाकदली, चंपाचीनी, मर्त्यकदली, रामकला, त्रिकोणी, जाड सालीची केळी अशा सर्व जाती आढळतात, तर परदेशात Dessert Banana व Cooking Banana असे प्रकार पडतात.
– लहान मुलांच्या आहारात केळ्याचा समावेश करावा. केळ्यातील लोह, तांबे, मॅंगनीज हे खनिजक्षार हिमोग्लोबिन तयार करण्यास उपयुक्त ठरतात. तसेच केळ्यातील कॅल्शिअम व फॉस्फरस घटक मुलांच्या शरीराच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरतात.
– केळ व तूप यांनी पित्तदोष कमी होतो.
– केळ्यांमुळे आतड्यातील काही जिवाणूंना पुष्टी मिळते व या जिवाणूंना हानिकारक असणाऱ्या इतर जिवाणूंचा नाश होतो.
– केळफुलाचा वापर मधुमेहींसाठी नक्कीच उपयुक्त ठरतो.
– पूर्ण पिकलेल्या केळ्यात antifungal, antibiotic गुणधर्म असतात. केळ हे पॉटॅशिअमचा चांगला स्रोत व सोडियमचे प्रमाण कमी असलेले फळ आहे. त्यामुळे रक्तदाबाच्या आजारावर मात करण्यास उपयुक्त ठरते.
– केळ थंड व भरपूर कर्बोदकेयुक्त असल्यामुळे सकाळी अस्वस्थपणा जाणवत असताना खाल्ले, तर गुणकारी ठरते.
– गोड खाणाऱ्यांसाठी केळ उपयुक्त असते.
– केळ्याला mood-food म्हटले जाते. केळ्याचे सेवन केल्याने ताणतणाव दूर होण्यास मदत होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केळ्याचे काही पदार्थ
रंभारस
साहित्य:- पिकलेली दोन केळी, दीड लिटर दूध, सात ते आठ चमचे साखर, अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, काजू, बदाम, खजूर, काळ्या मनुका अर्धी वाटी, दोन छोटे चमचे वेलची व जायफळ पूड.
कृती:- गॅसवर दूध उकळून एक लिटरपर्यंत करावे. मग दुधात क्रमाक्रमाने ड्रायफ्रुट्‌स घालून त्यात नारळाचा चव घालावा व शिजवावे. सर्वांत शेवटी साखर घालावी. रंभारस वाढताना पाच मिनिटे आधी केळ्याच्या गोल पातळ चकत्या आटवलेल्या दुधात घालाव्यात व रंभारस वाढावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बनाना मफिन
साहित्य :- १ पिकलेले केळे, २ पेले मैदा, पाव पेला दूध, १ लहान चमचा बेकिंग पावडर, १ पेला पिठीसाखर, पाव पेला लोणी किंवा तेल, चिमूटभर मीठ.
कृती :- मैदा, मीठ व बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. दुसऱ्या भांड्यात साखर व लोणी फेटा. त्यात दूध व कुस्करलेले केळे घालून परत फेटा. नंतर त्यात मैदा, मीठ व बेकिंग पावडर घालून फेटा. मफिन मोल्ड्‌सवर तुपाचा हात फिरवून घ्या. त्यात मिश्रण भरून आधीच गरम केलेल्या ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर २० मिनिटे बेक करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केळ्याचा शाही हलवा
साहित्य :- २ तयार केळी, अर्धा लिटर दूध, खोबऱ्याचा चव, १ वाटी साखर, पाव वाटी दाण्याचे कूट, बदाम, बेदाणे, केशर, वेलदोडेपूड, जायफळपूड.
कृती :- प्रथम केळी कुस्करून घ्या. त्यात दूध घालून शिजवायला ठेवा. मग खोवलेले खोबरे घालून ढवळत राहा. त्यात थोडे थोडे दूध घालून शिजवा. नंतर १ वाटी साखर, दाण्याचे कूट, बदाम व बेदाणे घालून शिजवा. गॅस बंद करून वेलदोडे पूड व जायफळ पूड घाला. केशर घालून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बनाना वॉलनट ब्रेड
साहित्य :- २ केळी, पाव वाटी आयसिंग शुगर, अर्धी वाटी मैदा, ३ चमचे दही, पाव वाटी लोणी, थोडी बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, अक्रोडचे तुकडे, ३ चमचे तेल, २ चमचे कोकोपावडर.
कृती :- एका भांड्यात वरील सर्व पदार्थ घेऊन चांगले फेटून घ्या. एका ट्रेला तुपाचा हात लावा व त्यात मिश्रण ओता. मग १८० डिग्री सेल्सिअसवर १० मिनिटे बेक करा व थंड झाल्यावर स्लाइस कापून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कच्ची केळी आणि मखाण्याचे रोल
साहित्य:- २ कच्ची हिरवी केळी, २ मध्यम आकाराचे बटाटे, २ मोठे चमचे बेसन, १५० ग्रॅम मखाणे, 1 चमचा लाल तिखट, जिरे, मीठ, तेल.
कृती :- केळी आणि बटाटे उकडून घ्या. मखाणे कोरडेच भाजा. मग ते मिक्सकरमधून फिरवून त्याची पावडर करा. उकडलेले बटाटे व केळी सोलून ते मऊ कुस्करून घ्या. त्यात मीठ व मसाले मिसळा. मग या मिश्रणात तीन ते चार चमचे मखाणे पावडर मिसळून मिश्रणाचे छोटे छोटे रोल करा. कढईत तेल गरम करून त्यात हे रोल खमंग तळून काढा. तळल्यावर मखाण्याच्या पावडरमध्ये घोळवून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केळी-अंजीर कोफ्ता
साहित्य:- ६ केळी, १ वाटी अंजीर, अर्धी वाटी चीज, ३ चमचे मैदा, ३ चमचे कॉर्नफ्लोअर, २ चमचे हिरवी मिरचीचे तिकडे, चिरलेली कोथिंबीर, मीठ, १ चमचा लिंबाचा रस, बडीशेप पूड, वेलची पूड, जायफळ पूड, पांढरी मिरेपूड प्रत्येकी अर्धा लहान चमचा.
कृती :- एका बाऊलमध्ये अंजीर तुकडे, चीज व कोथिंबीर एकत्र करा. दुसऱ्या बाऊलमध्ये केळी उकडून कुस्करून घ्या. मग वरील सर्व पदार्थ एकत्र करा. आवश्य्क असल्यास पाण्याचा हबका मारा. हाताला तेल लावून गोळ्याची पारी करा व अंजिराची मिश्रण त्यात भरा व कडा बंद करून गरम तेलात कोफ्ते तळून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

खमंग बनाना शेव
साहित्य:- पाव पेला तांदळाचे पीठ, अर्धा पेला बेसन, 1 कच्चे वाफवलेले केळे, 2 चमचे आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मीठ, तेल.
कृती:- तांदळाचे पीठ, बेसन व सोडा एकत्र चाळणीने चाळून घ्या. त्यात उकडलेले केळे सोलून मिसळा. आले-लसूण-मिरची पेस्ट, मीठ व एक चमचा तेल टाकून मिसळा. कढईत तेल गरम करा. शेव गाळण्याच्या यंत्राने बारीक शेव पाडून तळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*