अभ्यंग स्नान

भारतातील सण हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे हे वनौषधींपासून बनवलेले असावे, असा संकेत आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये भल्या पहाटे उठून अंगाला तेल लावून घातलेले स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान होय.

अभ्यंग स्नानासाठी जे सुवासिक तेल वापरले जाते ते केवळ सुवासिक न वापरता त्यासोबत कोमट तीळ तेलाने अभ्यंग करावा. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यंग करताना सर्वागाला तेल लावून हलकेसे मालिश करणे आवश्यक असते. अभ्यंग करताना तो हातापायांच्या ठिकाणी खालून वरच्या दिशेने करावा तर सांध्याच्या व पोटाच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने गोलाकार करावा. आपल्याकडे फक्त दीपावलीच्या दिवसांमध्येच केला जातो. अनेक कुटुंबातील स्त्रिया सर्व घरातील सदस्यांना अभ्यंग करून स्नान घालतात; परंतु स्वत:साठी वेळ काढून अभ्यंग करीत नाहीत.

अनेक जणींचा बाळंतपणानंतर अंगाला तेल लावून स्नान करणे एवढाच काय तो अभ्यंगाशी संबंध आलेला असतो. परंतु त्यामुळेच बऱ्याच स्त्रियांमध्ये नियमित अभ्यंग न झाल्याने वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, गुडघेदुखी, अंगदुखी अशा अनेक तक्रारी दिसून येतात. धावपळीच्या युगात बऱ्याचशा स्त्रिया डोक्यालादेखील तेल लावण्यास वेळ काढत नाही.

त्यामुळे केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केस व डोक्याची त्वचा रूक्ष होणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा तक्रारी अनेक जणींमध्ये आढळतात. या तक्रारी दूर करण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबरच आठवडय़ातून दोन वेळा डोक्याला तेल लावून हलकीशी मालिश करणे गरजेचे आहे.

नियमित अभ्यंग केल्याने रोजच्या रोज होणारे शारीरिक श्रम दूर होतात. शरीराला बल मिळते. शरीरातील वाढलेल्या वायूचे शमन होऊन दृढता प्राप्त होते. त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा कांतियुक्त होते. अभ्यंगामुळे आजच्या आधुनिक काळात प्रवासामुळे व हवेतील प्रदूषणामुळे होणारा वात प्रकोप व त्वचेवरील दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. नियमित अभ्यंग केल्याने भूक चांगली लागून मलबद्धतेचे विकार नाहीसे होतात. मानसिक थकवा दूर होऊन झोप चांगली लागते; मनाची एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढते.

एवढेच काय तर वृद्धत्व उशिरा येऊन चिरतारुण्य प्राप्त होते. म्हणून सर्वानीच दीपावलीच्या काळात तळपायापासून ते डोक्यापर्यंत सर्व अवयवांना अभ्यंग करावे व नंतरही आठवडय़ातून एकदा तरी सुटीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे.

अभ्यंगानंतर स्नान करताना सुगंधी उटणे लावण्याची प्रथा आहे. शरीराला लावलेले तेल त्वचेमध्ये जिरून शिल्लक राहिलेले जास्तीचे तेल किंवा त्वचेचा तेलकटपणा जावा व शरीरातील रक्ताभिसरण सुधारून हालचालीमधला सहजपणा व चपळपणा कायम राहून शरीराला सुगंध यावा. हा यामागे उद्देश असतो. जसे अभ्यंग करताना आपण तेल लावतो अगदी त्याच दिशेने व पद्धतीने उटणेही शरीराला लावावे.

जाहिरातीमध्ये आकर्षक वाटलेला परंतु रासायनिक प्रक्रियेने तयार केलेला साबण या अभ्यंगाच्या वेळी लावू नये. त्यामुळे त्वचा जास्तच रूक्ष होते. म्हणून कुठलाही साबण लावू नये. अशा पद्धतीने अभ्यंग करून उटणे लावून नंतर सोसवेल अशा गरम पाण्याने केलेले स्नान शरीर स्वच्छ करून मनाला तरतरीतपणा, प्रसन्नता आणते व एकूणच शरीराचे सर्व आजार बरे होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते.

अभ्यंगासाठी तेल अभ्यंग करण्यासाठी कोमट तीळ तेल वापरावे किंवा आपल्या प्रकृतीनुसार व एखादी व्याधी असेल तर त्या व्याधीनुसार वेगवेगळी तेले तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरता येतात. उदाहरणार्थ वातशामक तेल, चंदन बलालाक्षादी तेल, सहचर तेल आदी.

उटणे सहसा उटणे हे घरीच किंवा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार वापरावे. बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्ये अनेक वेळा चूर्णाची भेसळ झालेली दिसून येते.

उटणे बनविण्याची कृती.
साहित्य:- पाव किलो मसूर डाळ पीठ, २५ ग्रॅम आवळकाठी, २५ ग्रॅम सरीवा, २५ ग्रॅम वाळा, २५ ग्रॅम नागर मोथा, २५ ग्रॅम जेष्टमध, २५ ग्रॅम सुगंधी कचोरा, ५ ग्रॅम आंबेहळद, २५ ग्रॅम तुलसी पावडर, २५ ग्रॅम मंजीस्ट, ५ ग्रॅम कापूर. ( हे सर्व साहित्य कास्टा औषधीच्या दुकानात मिळते.)
कृती : वरील सर्व साहित्य चांगले मिक्स करून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.
हे उटणे लावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारून त्वचा कांतियुक्त होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*