रोजच्या जेवणात बदल म्हणून केली जाणारी आंबट-गोड कढी म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच. ही कढी कोकणातली असो, नाही तर खानदेश-विदर्भातली; ती खिचडी-भाताबरोबर किंवा भाकरी-चपातीबरोबर भुरकण्याची मजा काही औरच असते! नेहमीच्या वरण-आमटीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास याद येते ती कढीची! तसंच दुपारी जर साग्रसंगीत जेवण झालं असेल आणि रात्रीला साधंच काही करायचं असेल, तरीही गृहिणीला आठवण येते ती कढीचीच!! कारण वरण-आमटीला कढीइतका सुरेख पर्याय दुसरा असूच शकत नाही. शिवाय पचण्याच्या दृष्टीनेही कढी केव्हाही बेस्टच. तेव्हा जिभेला थोडी वेगळी चव हवी असेल अणि पचायला हलकं असं काही खायचं असेल, तर रात्रीच्या मेन्यूत कढी-भात, कढी-खिचडी किंवा फक्त कढी-चपाती हा बेत ठरलेलाच. पटकन करण्याजोगा आणि चटकन खाण्याजोगा. यातही जास्त महत्त्व कढीलाच. कारण कढीपत्त्याचा खमंग वासाची नि आंबट-गोड चवीची कढी म्हणजे… खरंतर पिण्याचीच गोष्ट. वाटी सरळ तोंडाला लावायची आणि मग ओठावर उमटलेली मिशी चक्क जीभ फिरवून पुसून टाकायची.
कढी हा प्रकार भारतात सगळी कडे सारख्याच पद्धतीने बनवतात. गुजराती, राजस्थानी आणि पंजाबी कढी हे त्यातल्या त्यात फेमस प्रकार. पंजाबी कढी हि आपल्या कढी पेक्षा घट्ट असते. कधी -कधी त्यांच्या कढी मध्ये मुळा टाकलेला असायचा. गुजराती कढी थोडी गोड असते पण त्यात मसाले पण जास्त असतात. गुजराती खिचडी बरोबर हा प्रकार अत्यंत छान लागतो. राजस्थानी आणि गुजराती कढी मध्ये मेथीचे दाणे टाकतात. काही ठिकाणी कढी सोबत गोळे बनवले जातात. त्याला कढीगोळे असे म्हणतात. काही ठिकाणी यात पकोडे पण घालतात. भेंडी घालुन कढी बनवायच्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कढीच्या काही कृती
पंजाबी कढी
साहित्य : १०० ग्रॅम फूलकोबी, २५० ग्रॅम हिरवे मटर, २ बटाटे, ५० ग्रॅम अरबी, १/४ दुधी भोपळा, फ्रेंचबिन्स शेंगा, ५-६ हिरव्या मिरच्या, २ टोमॅटो, २५ ग्रॅम चिंच, अर्धा कप बेसन, दोन मोठे चमचे तूप.
कृती : सर्व भाज्यांना कापून एकीकडे ठेवावे. कढईत एक पळी तूप गरम करून पाव चमचा मेथी, एक चमचा जिरे व पाव चमचा मोहरीची फोडणी द्यावी. बेसन घालून गुलाबी होईपर्यंत भाजावे. दोन चमचे धने, एक चमचा मिरची, एक चमचा हळद, दीड चमचा मीठ व चार ग्लास पाणी टाका. आता कढईत सर्व भाज्या टाकून ५-६ मिनिटापर्यंत भाजावे. भाजल्यानंतर भाज्या कुकरमध्ये टाकून दोन शिट्टी होईपर्यंत आंचेवर ठेवावे. शिट्टी आल्यानंतर चिंचेचे पाणी टाकावे. वाढताना लाल मिरची, हिरवी मिरची, जिरे व हिंगाची फोडणी द्यावी आणि वरून थोडेसे धने टाकावे. याला भात किंवा पोळीसोबत घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पकोडेवाली कढी
साहित्य- दीड कप आंबट दही (दही आंबट नसेल तर आमचूर पावडर घाला.), ५ ते ६ टेबलस्पून बेसन, ३ कप पाणी, तिखट १ चमचा, हळद अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, मीठ.
पकोडय़ासाठी – अर्धा कप बेसन, चिमूटभर खायचा सोडा, मीठ, ओवा पाव चमचा हातावर रगडून घाला. २ हिरव्या मिरच्या व थोडे आल्याचे बारीक तुकडे घालून बेसन भिजवून घ्या व त्याचे पकोडे बनवून ठेवा.
कृती- दही घुसळून त्यात पाणी, बेसन, तिखट, मीठ, हळद, हिंग घालून पुन्हा घुसळा. कुकरमध्ये ८ ते १० मिनिटे शिजवा. पकोडे घाला. २ टेबलस्पून साजूक तूप गरम करा. त्यात १ चमचा जिरे, पाव चमचा धने, पाव चमचा मेथी, पाव चमचा हिंग, ४ सुक्या लाल मिरच्या घालून फोडणी करा व कढीवर ओता. वर कोथिंबीर पेरा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply