नाचणीच्या शेवया घरी बनविणे
साहित्य – नाचणी पीठ ५०० ग्रॅम, गव्हाचे पीठ ४०० ग्रॅम, भाजलेले सोयाबीन पीठ १०० ग्रॅम, चवीपुरते मीठ.
कृती – वरीलप्रमाणे सर्व पीठे एकत्र करून घ्यावीत. त्यामध्ये पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे आणि शेवया मशीनमधून शेवया तयार करून उन्हात वाळवाव्यात. मधुमेही आणि हृदयरोगी रुग्णासाठी या शेव्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. त्यामध्ये प्रथिने, फॅट, कार्बोहाड्रेटस कॅल्शियम, लोह आणि कॅलरी (एनर्जी) याचे प्रमाण संतुलीत राखण्यास मदत होते. या शेवयांचा वापर करून शेवयाची खीर, पुलाव, उपमा, इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, कटलेट असे अनेक पदार्थ तयार करता येतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पाटीवरील व हातावरील शेवया
साहित्य – १ कि. गव्हाचा रवा, अर्धा कि. मैदा, चवीला मीठ आणि थोडं तेल.
कृती – रवा व मैदा एकत्र करावा. त्यात चवीला मीठ घालून भिजवावा. शेवया करायच्या चार तास आधी पीठ भिजवून आणि झाकून ठेवावं. नंतर सैलसर मळून घ्यावं. मळताना हाताला थोडं तेल लावावं. सैल पिठाचा लहान गोळा हातात घेऊन तो लांबवावा. दोन्ही हातानी लांबवून बोटांवर घेऊन पदर काढावे. लांबवताना हे पदर बारीक होतात. दोन्ही हातांच्या बोटांवर घेऊन जेवढे लांबवाल तेवढी शेवयी बारीक होते. हे पदर तोडून कापड घातलेल्या खाटेवर टाकावे. ते हवेनं व उन्हानं वाळतात. अशीच कृती पीठ संपेर्पयत करावी. शेवया खाटेवरून वाळल्या की अलगद निघतात.
ज्या बायकांना शेवया हातावर करणं जमत नाही, त्या लांब गुळगुळीत पाटीवर तेल लावून किंवा कोरडं पीठ लावून बारीक घासतात. एक पाटी उंचावर ठेवून दोन्ही हातांनी गोळा घासते व दुसरी तोडून तोडून खाटेवर वाळायला टाकते.
मशिनच्या शेवयांपेक्षा या शेवया रूचकर लागतात. आमरसाबरोबर, दुधसाखरेबरोबर किंवा उकडूनही खातात. उकळत्या पाण्यात थोडं तूप किंवा तेल घालावं. त्यात शेवया २-३ मिनिटं उकडाव्या. नंतर चाळणीत ओतून पाणी काढून घ्यावं. या शेवया दूध-साखर घालून किंवा आमरसाबरोबर खायला द्याव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तांदळाच्या शेवया (गोडाच्या)
साहित्य : दोन वाट्या चांगले पांढरे स्वच्छ तांदूळ, एक नारळ, अर्धा लिटर दूध, साखर किंवा गूळ, वेलदोडे.
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन ते फडक्यावर वाळवावेत. सुकल्यावर ते दळून त्याचे पीठ करून बारीक चाळणीने चाळून घ्यावे. जितके पीठ होईल, तितकेच पाणी घेऊन ते एका पातेल्यात उकळावयास ठेवावे. त्यात चवीला मीठ व दोन चमचे तूप घालावे. उकळी आल्यावर पातेले खाली उतरून लागलीच त्यात पीठ घालावे. नंतर ते ढवळून मंद विस्तवावर ठेवून, दोन वाफा आणून घ्याव्यात. नंतर पातेले खाली घेऊन उकड गरम असतानाच एखादे भांडे घेऊन मळावी. उकड मळून झाल्यावर त्याचे मुटके करावेत. ते मुटके मोदकपात्रात ठेवून वाफ येऊ द्यावी. चांगली वाफ आल्यावर एक एक मुटका शेवपात्रात घालून त्याचा शेव पाडाव्या. नारळ खोवून त्याचे दूध काढावे. अर्धा लिटर दूध घेऊन त्यात हे नारळाचे दूध घालावे. त्यात चांगले गोड होईल, इतकी साखर किंवा गूळ व वेलदोड्यांची पूड घालावी. खावयास देते वेळी डिशमध्ये शेवयांवर दूध घालून द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply