साहित्य:- एक वाटी अळशी (जवस),एक वाटी काळे तीळ,एक वाटी खसखस,३-४ टेबलस्पून डिंक पावडर,एक वाटी बदामाचे काप, दोन वाट्या कणीक, ३-४ वाट्या ताजा खवा, एक वाटी साजूक तूप, तीन वाट्या साखर.
कृती:- गॅसवर एक कढई गरम करून घ्या व त्या गारा कढईत मध्यम आंचेवर जवस, काळे तीळ आणि खसखस तीनही स्वतंत्रपणे वेगवेगळे खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्या. थंड झाल्यावर तीनही वेगवेगळे ग्राईंडरवर वाटून घ्या. (वेगवेगळे वाटण्याचे कारण असे की तीळ सगळ्यात लवकर बारीक वाटले जातात तर खसखस बारीक वाटायला सगळ्यात जास्त वेळ लागतो) नंतर त्याच गरम कढईत साजूक तुपात डिंकाची पावडर तळून घ्या. आता त्याच कढईत शिल्लक तुपात कणीक घालून मध्यम आंचेवर कणीक ५-७ मिनिटे लालसर रंगावर परतून/भाजून घ्या. एका मोठ्या परातीत भाजलेली कणीक काढून घ्या व त्यात साजूक तुपात तळलेली डिंकाची पावडर आणि मिक्सरवर वाटून घेतलेले जवस, काळेतीळ आणि खसखस घालून चांगले मिक्स करा. आता त्या भाजलेल्या कणकेच्या कढईतच खवा घाला आणि सोनेरी लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा गरम खरपूस व खमंग भाजलेला खवा आता त्या कणकीत घाला आणि साखरही घालून सगळे पुन्हा एकदा चांगले हलवून मिक्स करा. उलथण्याने खालीवर करत रहा. साखर मिश्रानांत विरघळली की त्यातील एक मोठा चमचाभर मिश्रण तूप लावलेल्या हातात घ्या आणि दुसर्यास हाताच्या बोटांनी त्याचा गोल आकार देत लाडू वळा. याच प्रकारे बाकीचे सगळे लाडू वळून घ्या आणि थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply