केळी अनेक प्रकारची असतात. हिरवी, वेलची, रस्ताळी, पांढरी, लांब केरळची, लाल मद्रासी… अशी अनेक नावे घेऊन त्यातले प्रकार आपल्यासमोर फडा काढून उभे असतात. केळ्यात भरपूर पोटॅशियम, सोडियम, क्लोरिन, लोह, अमिनो ऍसिड, फोलेट अशी अनेक पोषणद्रव्ये असतात. एका मोठ्या केळ्यातून साधारण १०० कॅलरीज मिळतात. यात गर भरपूर पण रस कमी असतो. त्यामुळे दमून आलं की एक केळे खाल्ले तरी पोट भरल्याचं समाधान मिळतं. ते पचायला जड असले तरी शक्तीवर्धक आहे. तरूण वयात स्वप्नावस्थेवर रोज एक केळे खावे. केळ्याने मलावरोध, पोटात व शरीरात होणारी आग कमी होते. रक्तपित्त, मुतखडा यांच्यावर शीतलतेमुळे केळे खाणे चांगले. कोवळे केळे हे गोड, तुरट, काहीसे आंबट, पित्तनाशक व रूचीदायक आहे. केळीचे पान वेदनाशामक तर कंद कृमि कमी करणारा आहे. पिकलेले केळे मात्र पचायला जड पण पित्त व रक्तदोष नाहीसे करणारे आहे. धातूंची वृद्धि करणारे व तृप्तिदायक आहे. असे हे केळे आपल्याला पचेल त्यावेळी व त्या त्या प्रकारचे व प्रकाराने खावे. केळ्याचा उपयोग बिस्किटे, ब्रेड, कुकीज, आईस्क्रीम, टॉफीज, पुडिंग्ज, मफिन्स, मिल्क शेक्स यात करून त्यांची चव बदलता येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळे-अंजीर कोफ्ता
साहित्य :- ६ कच्ची केळी, १ वाटी अंजीर, अर्धी वाटी चीज, ३ चमचे मैदा, ३ चमचे कॉर्नफ्लोअर, २ चमचे हिरवी मिरचीचे तुकडे, चिरलेली कोथिंबीर, मीठ, १ चमचा लिंबाचा रस, बडीशेप पूड, वेलची पूड, जायफळ पूड, पांढरी मिरेपूड प्रत्येकी अर्धा लहान चमचा.
कृती :- एका बाऊलमध्ये अंजीर तुकडे, चीज व कोथिंबीर एकत्र करा. दुसऱ्या बाऊलमध्ये केळी उकडून कुस्करून घ्या. मग वरील सर्व पदार्थ एकत्र करा. आवश्यीक असल्यास पाण्याचा हबका मारा. हाताला तेल लावून गोळ्याची पारी करा व अंजिराचे मिश्रण त्यात भरा व कडा बंद करून गरम तेलात कोफ्ते तळून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळे फिंगर तीळ
साहित्य:- ४ ब्रेड स्लाइस, १ लहान चमचा पांढरे तीळ, २ वाफवलेली कच्ची केळी, १ बारीक चिरलेला टोमॅटो, १ बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, लिंबाचा रस, काळे मिरेपूड, मीठ.
कृती :- उकडलेली केळी किसून घ्या. ब्रेड व तीळ सोडून सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करा. ब्रेडवर हे मिश्रण लावा. मग तीळ लावा. ओव्हनमध्ये सोनेरी रंगावर ग्रील करा. प्रत्येक स्लाइसचे तीन उभे तुकडे कापा. सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळ्याचा डोसा
साहित्य :- ४ पिकलेली केळी, ६ मोठे चमचे साखर, २ मोठे चमचे तांदळाचे पीठ, ३ मोठे चमचे मैदा, १ लहान चमचा बेकिंग पावडर, अर्धा पेला दूध.
कृती :- मिक्सरमधून सर्व साहित्य बारीक करून घ्या. तयार पीठ तव्यावर टाकून डोसा बनवा. गरमागरम डोसा मधासोबत सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळे वॉलनट ब्रेड
साहित्य :- २ केळी, पाव वाटी आयसिंग शुगर, अर्धी वाटी मैदा, ३ चमचे दही, पाव वाटी लोणी, थोडी बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, अक्रोडचे तुकडे, ३ चमचे तेल, २ चमचे कोकोपावडर.
कृती :- एका भांड्यात वरील सर्व पदार्थ घेऊन चांगले फेटून घ्या. एका ट्रेला तुपाचा हात लावा व त्यात मिश्रण ओता. मग 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटे बेक करा व थंड झाल्यावर स्लाइस कापून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळ्याचे गुलाबजाम
साहित्य :- १ भांडे रवा, अर्धा भांडे दूध, २ लहान चमचे पनीर, १ पिकलेले केळे, १ पेला साखर, थोडे केशर, तेल.
कृती :- एक चमचा दुधात केशर भिजवा. रवा परतून घ्या. एका डिशमध्ये पनीर, रवा, दूध व केळे घालून मळून घ्या. लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा. कढईत तेल गरम करून सोनेरी रंगावर तळून घ्या. एका भांड्यात १ पेला साखर व १ पेला पाणी उकळून पाक तयार करा. पाकात केशर घाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळ्याचा शाही हलवा
साहित्य :- केळी, अर्धा लिटर दूध, खोबऱ्याचा चव, १ वाटी साखर, पाव वाटी दाण्याचे कूट, बदाम, बेदाणे, केशर, वेलदोडेपूड, जायफळपूड.
कृती :- प्रथम केळी कुस्करून घ्या. त्यात दूध घालून शिजवायला ठेवा. मग खोवलेले खोबरे घालून ढवळत राहा. त्यात थोडे थोडे दूध घालून शिजवा. नंतर १ वाटी साखर, दाण्याचे कूट, बदाम व बेदाणे घालून शिजवा. गॅस बंद करून वेलदोडे पूड व जायफळ पूड घाला. केशर घालून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केळाचे वेफर्स
साहित्य :- २ कच्ची केळी, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा हळद, तेल.
कृती :- केळी सोलून त्याचे काप करा. त्याला हळद व मीठ चोळून एक ते दोन मिनिटे तसेच राहू द्या. मग कढईत तेल गरम करून ते काप तळून घ्या. सोनेरी रंगावर तळून काढा. कुरकुरीत होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कच्ची केळी आणि मखाण्याचे रोल
साहित्य :- २ कच्ची हिरवी केळी, २ मध्यम आकाराचे बटाटे, २ मोठे चमचे बेसन, १ चमचा लाल तिखट, जिरे, मीठ, तेल, व १५० ग्रॅम मखाणे (मखाणे म्हणजे कमळाच्या बिया. कमळाला शंकूच्या आकाराचं फळ लागतं. पाकळीच्या मध्यभागी ‘स्त्री केसर’ असतात. या स्त्रीकेसराच्या सपाट खोबणीत काळय़ा बिया असतात. या बिया भाजून त्यांच्यापासून लाह्या तयार केल्या जातात.)
कृती :- केळी आणि बटाटे उकडून घ्या. मखाणे कोरडेच भाजा. मग ते मिक्सररमधून फिरवून त्याची पावडर करा. उकडलेले बटाटे व केळी सोलून ते मऊ कुस्करून घ्या. त्यात मीठ व मसाले मिसळा. मग या मिश्रणात तीन ते चार चमचे मखाणे पावडर मिसळून मिश्रणाचे छोटे छोटे रोल करा. कढईत तेल गरम करून त्यात हे रोल खमंग तळून काढा. तळल्यावर मखाण्याच्या पावडरमध्ये घोळवून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply