भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ६ – जैन, बुद्ध, मौर्य आणि गुप्त काळ

<i>भारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत. </i>
<hr>

जैन आणि बुद्ध काळामधे अहिंसेचा प्रसार झाला. त्यामुळे शाकाहारावर जास्त भर देण्यात येऊ लागला. फळांचे आणि फळांच्या रसाचे अनेक प्रकार या काळामधे उदयास आले. मिठाईचेही अनेक प्रकार होते. मांस आणि दारू यांचा वापर करण्यावर बंधन आल्यामुळे या सर्व गोष्टींवर भर दिला गेला असावा. या काळात डाळी आंबवून त्यापासून केलेले वडे आवडीने खाल्ले जात. साखरभात, गूळपापडी, धीवर यांसारखे पदार्थ वनविले जात. दुधापासून पनीर बनविण्याची पद्धत माहीत होती. पनीरला अमिक्सा म्हणत. त्यापासून रसगुल्ले बनवीत त्यांना मोरेंडक म्हटले जाई.

ख्रिस्तपूर्व ३०० मधे कौटिल्याने मौर्यकालीन अन्नपद्धतींचे वर्णन अर्थशास्त्रामधे केले आहे. त्यानुसार कत्तलखान्यामधील काम एका मोठ्या अधिकार्‍याच्या पर्यवेक्षणाखाली होत असे. दुकानांमधून शिजविलेले मांस विक्रीला असे. मासे आणि भाज्या यांचा उल्लेख कौटिल्याने केला आहे. कारण पूर्व भारतातील लोकांच्या आहारात या गोष्टी नेहमी होत्या, अजूनही आहेत. मौर्यकालात हरणाचं मांस आणि तांदूळ यापासून बनविलेला पदार्थ विशेष लोकप्रिय होता. सारंग जातीच्या हरणाचा त्यासाठी विशेष उपयोग केला जात असे. गंमत म्हणजे रामायणात हरणाचं मांस, तांदूळ, भाज्या आणि मसाले वापरून
तयार झालेला मांसभूनदन हा पदार्थ सीतेचा अत्यंत आवडता होता असं काही ग्रंथात म्हटले आहे.

गुप्तकाळामधे पुन्हा शाकाहारी असण्याच्या बौद्ध आणि जैन धर्माच्या शिकवणुकीला उजाळा मिळाला. तिसर्‍या ते पाचव्या शतकातल्या या काळात भारत समृद्धीच्या शिखरावर होता असं म्हणायला हरकत नाही. कालिदास, वराहमिहिर, विष्णुशर्मा, वात्सायन, आर्यभट या विद्वानांनी विविध विषयांवर अमूल्य अशी ग्रंथ निर्मिती या काळात केली. अन्नपदार्थांबद्दलचे उल्लेख कालिदास, वराहमिहिर, वात्सायन यांच्या ग्रंथांमधून आहेत. ज्यावरून त्या काळच्या
आहाराबद्दल कल्पना येते. लसूण औषध म्हणून वापरण्यास सुरवात झाली होती. त्याकाळचं ऐश्वर्य अजिंठ्याच्या चित्रांमधेही दिसतं. तांदूळांपासून बनवलेले पदार्थ, दूध आणि दुधाचे पदार्थ, फळं आणि त्यांचे रस यांचा भरपूर समावेश त्या काळच्या आहारात होता.

स्त्री पुरुष दोघांनी मद्यपाशन करण्याची प्रथा होती. कालिदासांचं शाकुंतल, रघुवंश, वात्सायनाचं कामसूत्र यामधे अशा प्रकारच्या देखाव्यांची वर्णने आहेत. अजिंठ्याच्या चित्रामधेही आहेत.

— डॉ. वर्षा जोशी

## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ६

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*