भारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.
भारतावर अनेकांची आक्रमणे झाली. अनेक देशांबरोबर व्यापारही होता आणि त्याचा परिणाम इथल्या खाद्यसंस्कृतीवर कसा झाला ते पहाणंही मनोरंजक ठरेल तेव्हां त्याचा आढावा आता घेऊ. भारताचा व्यापार ग्रीक, रोमन आणि इजिप्शियन लोकांबरोबर होता. या व्यापारामुळे आपल्याकडे केशर माहीत झालं
आणि मध वापरून केकसारखी वस्तू बनविली जाई. अलेक्झांडरच्या सरदाराने ही वस्तू इराकमधे आणि तिथून ग्रीसमधे नेली. आजच्या काळातही ग्रीसमधे तीळ आणि मध वापरून केक बनविले जातात.
अरब लोकांच्यामुळे भारतात कॉफी आली. त्यांच्यामुळेच युनानी पद्धतीच्या औषधांची माहिती झाली. ज्या लोकांचे संबंध विशेष करून केरळमधल्या मलबार राज्यांशी होते. म्हणूनच अगदी अजूनही कॉफी दक्षिण भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. अरबांमुळे हिंग आणि पिस्ते या दोन गोष्टींची माहितीही भारताला झाली. सिरियन ख्रिश्चन लोकांनंतर पर्शियन झोरोस्ट्रियन्स भारतात आले. असं म्हणतात की बिर्याणी प्रथम त्यांनी भारतात आणली आणि मोंगलांनी ती लोकप्रिय केली. पारशी लोकांचा डाळी, मटण आणि भाज्या वापरून केलेला धनसाक हा पदार्थ आणि केळीच्या पानात गुंडाळून वाफवलेला मासा हे दोन्ही आता इथलेच झाले आहेत.
आठव्या ते बाराव्या शतकामधे हूण, गुर्जर, आणि तिबेटी लोक भारतात स्थिरावले आणि गुप्त काळात निर्माण झालेलं शाकाहाराचं प्राधान्य कमी होऊन पुन्हा एकदा लोकांना मांसाहार आवडू लागला. विशेषकरून राजपूत लोकांमधे त्याला प्राधान्य मिळालं. आर्यांच्या काळात असलेलं तुपाचं महत्व कमी होऊन एव्हाना तेल वापरण्यास सुरवात झाली होती. तिळाचं तेल सर्वोत्कृष्ट मानलं जाई.
— डॉ. वर्षा जोशी
## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ९
Leave a Reply