गाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो. संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते. भारतातही ते सर्वत्र मिळते. गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो. सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते. संस्कृतमध्ये शिखाकंद इंग्रजीमध्ये कॅरट लॅटिनमध्ये डॉक्स कॅरोटा या नावाने परिचित असलेले गाजर अंबेलिमेरी या कुळातील आहे. गाजराचे अनेक प्रकार आहेत. त्यात देशी गाजराचा रंग गडद गुलाबी असतो; तर विलायती गाजराचा रंग हा फिकट गुलाबी असतो. देशी (दिल्ली) गाजरे ही चवीने खूप गोड व पौष्टिक असतात. विलायती गाजरे ही चवीने फिकट व पाणीदार असतात. औषधी गुणधर्म गाजरामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, अ, ब, क जीवनसत्त्व त्यात असते. त्याचबरोबर प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थही असतात. गाजरामध्ये कॅरोटिन हा घटक विपुल प्रमाणात असतो. आयुर्वेदानुसार गाजर हे मधुर, अग्नीप्रदीपक, कृमीनाशक, दीपक, पाचक आहे. गाजरामध्ये असणाऱ्या या सर्व गुणधर्मामुळे शरीर स्वच्छ व शुद्ध राहते. गाजर चावून खाल्यामुळे दात व तोंड स्वच्छ होते. त्याचबरोबर ते अल्कली गुणधर्माचे असल्यामुळे रक्त शुद्ध होऊन संपूर्ण शरीराला रसरक्त पुरवठा सुरळीत होतो. गाजर चावून खाल्यामुळे तोंडामध्ये लाळ अधिक प्रमाणात सुटते व त्यामुळे घेतलेले जेवण व्यवस्थित पचते. गाजरामध्ये विपुल प्रमाणात ‘अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे त्याच्या सेवनाने शक्ती निर्माण होते. म्हणून लहान बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ चांगली होण्यासाठी नियमितपणे रोज एक गाजर सेवन करावे.
लहान बालकांना दात निघताना अनेक वेळा पचनाच्या तक्रारी उद्भवतात. त्या होऊ नयेत म्हणून सकाळ-संध्याकाळ ३ ते ४ चमचे गाजराचा रस पाजावा. तसेच बालकांना चघळण्यासाठी गाजर द्यावे. यामुळे हिरडय़ांची सळसळ कमी होऊन दात येतानाचा त्रास कमी होतो व अन्नाचेही सहज पचन होते. गाजराचे बी हे आकाराने लहान, भुरकट रंगाचे सुवासिक, शक्तीवर्धक, मूत्राशयाचे विकार दूर करणारे व गर्भाशयाच्या वेदनांवर व विकारांवर उपयोगी आहे. गाजर वाफवून त्याचे पोटीस करून शरीरावरील बेंडावर लावल्यास बेंड फुटून जखम लवकर बरी होते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गाजराचा नियमितपणे आहारात वापर करावा. शरीरावरील कुठलीही खराब जुनी जखम बरी होण्यासाठी किसलेले गाजर वाफवून त्याचे पोटीस करून लावावे.
अर्धशिशीचा(मायग्रेनचा) त्रास होत असेल तर गाजराच्या पानांचा रस काढून तो रस तीळ तेलामध्ये उकळून नाकात किंवा कानात २-२ थेंब टाकल्यास व त्याच तेलाने डोके व कपाळ चोळल्यास अर्धशिशी थांबते. गाजर हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे सहसा गर्भावस्थेत पहिल्या ५ महिन्यांत त्याचा वापर जास्त प्रमाणात करू नये. ‘अ’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असल्यामुळे गर्भावस्थेच्या ५ महिन्यांनंतर गाजराचा वापर योग्य प्रमाणात करण्यास हरकत नाही.
रोज मर्यादित प्रमाणात गाजर खाल्ले, तर कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. मधुमेहावर उपाय
रक्तातील साखरेचे नियमन करण्यासाठी गाजराचा उपयोग होतो. गाजरामध्ये कॅरोटीनॉईड्स हा घटक असतो. रक्तातील वाढलेली साखर कमी करण्याचे काम कॅरोटीनॉईड्स करते. लालचुटूक, शिडशिडीत गाजरे बाजारात आली, की सगळ्यांना गाजराच्या हलव्याचे वेध लागतात. गाजरापासून तयार होणारा गाजर हलवा किंवा लोणचे हे दोनच प्रकार सर्वसामान्यांना परिचित आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही वेगळे गाजराचे काही पदार्थ
Leave a Reply