छोले
साहित्य : १ कप पांढरे काबुली चणे (White Chickpeas), १ कप बारीक चिरलेला कांदा, अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो, दिड टिस्पून छोले मसाला.
फोडणीसाठी : १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल तिखट, १ टिस्पून आले पेस्ट, ३ लसूण पाकळ्यांची पेस्ट, १ टिस्पून आमचूर पावडर, १ टिस्पून धणेपूड, २-३ टिस्पून तेल, कोथिंबीर, लिंबू, मीठ.
कृती : चणे ९-१० तास भिजत घालावे. नंतर कूकरमध्ये ४ शिट्या करून चणे शिजवून घ्यावे, शिजवताना पाण्यात थोडे मिठ घालावे. चणे मऊसर शिजवावे. अगदी जास्त शिट्ट्या केल्या तर चणे फुटतात. त्यामुळे प्रत्येकाने घरातील कूकरचा अंदाज घेउन चणे शिजवावेत. कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरावेत. चणे शिजले कि कढईत २-३ टिस्पून तेल गरम करावे. जिरे, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी, आले-लसूण पेस्ट घालून परतावे, कांदा परतावा. कांदा परतला कि त्यात टोमॅटो घालावा. थोडी धणेपूड घालावी. मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. टोमॅटो अगदी नरम झाला कि शिजलेले चणे घालावेत, चवीपुरते मीठ घालावे म्हणजे चणे शिजताना मीठ आत मुरते. आवश्यक तेवढे पाणी घालावे. मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी. २-३ मिनीटांनी छोले मसाला आणि आमचूर पावडर घालून ढवळावे. जर मीठ किंवा तिखट कमी वाटत असेल तर वरून घालावे. थोडावेळ मंद आचेवर उकळू द्यावे.
भटुरे
साहित्य: १ वाटी दही, २ वाटी मैदा, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती: दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ भिजवावे. दही आणि मीठ एकत्र केल्याने दह्याला किंचित पाणी सुटते त्यामुळे १-२ चमचे मैदा अधिक लागू शकतो. थोडे तेल घालावे. पिठ मळून घ्यावे. पिठ ४-५ तास झाकून ठेवून द्यावे. ४-५ तासांनंतर परत एकदा पिठ मळून घ्यावे. त्याचे मध्यम आकाराचे गोळे करावे (२ ते अडीच इंच आकाराचे). तेल तापत ठेवावे. पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या पुर्या लाटाव्यात. खुप पातळ लाटू नये.
हे भटूरे तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे. छोल्यांबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.
Leave a Reply