साहित्य:-चकोल्यांसाठी. १/२ ते ३/४ कप गव्हाचे पिठ, १/२ टिस्पून मिठ, १ टिस्पून तेल, आमटीसाठी. १/२ कप तूर डाळ.
फोडणीसाठी: १ टिस्पून तूप, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट, १ हिरवी मिरची, ४ ते ५ कढीपत्ता पाने, २ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून, २ आमसुलं, १ टेस्पून गूळ (ऐच्छिक), १ टिस्पून गोडा मसाला, २ टेस्पून ताजा खोवलेला नारळ, साजूक तूप, चवीपुरते मिठ.
कृती:- तूरडाळ कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी. नंतर डाळ घोटून घ्यावी. गव्हाचे पिठ, मिठ आणि १ टिस्पून तेल घालून पोळीसाठी मळतो तशी कणिक मळून घ्यावी. कढईत १ टिस्पून तूप गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, मिरची आणि कढीपत्ता पाने घालून फोडणी करावी. कोथिंबीरही फोडणीत घालून परतावी. घोटलेली डाळ फोडणीस घालावी. १/२ ते ३/४ कप पाणी घालून डाळ थोडी पातळ करावी. गोडा मसाला, मीठ, आमसुलं, नारळ आणि गूळ घालून मध्यम आचेवर आमटीला उकळी येऊ द्यावी. उकळी येत असताना कणकेची पोळी लाटावी. कातणाने किंवा सुरीने मध्यम आकाराचे शंकरपाळे करून उकळत्या आमटीत घालावे. ५ मिनीटे उकळी काढून चकोल्या शिजू द्याव्यात. चकोल्या ताटात वाढून त्यावर साजूक तूप घालून गरमागरम सर्व्ह करावे.
टीप:- चकोल्यांची कणिक मळताना थोडा ओवा, लाल तिखट, हळद घातली तरी चांगली चव येते. आंबटपणासाठी आमसुलाऐवजी चिंचेचा कोळ घातला तरी चालेल.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply