साहित्य –
५०० ग्रॅम बासमती तांदळाची पिठी, एक मोठा नारळ, साखर, तीन-चार पेढे, पाच-सहा वेलदोड्याची पूड, पाच-सहा काजू, अर्धा चमचा रोझ इसेन्स, मीठ, एक लहान वेलची केळ, हिरवा, पिवळा व लाल रंग.
कृती –
प्रथम सारण तयार करून घ्यावे. ओले खोबरे एखाद्या पातेलीने मोजून घ्यावे. २ पातेल्या खोबरे असेल तर १ पातेली साखर तयार करावी. नंतर साखर व खोबरे एकत्र करून जरा शिजवून घ्यावे व खाली उतरवावे. त्यात वेलदोड्याची पूड, काजूचे काप, रोझ इसेन्स, कुस्करलेले पेढे व केळ्याचे काप घालावेत.तांदळाचे पीठ एखाद्या पातेलीने मोजून घ्यावे. एका मोठ्या पातेल्यात पिठाइतके पाणी मोजून घ्यावे. त्यात एक टे.स्पून तूप व चवीसाठी थोडे मीठ घालावे.
पाण्याला उकळी आली, की खाली उतरवून त्यात तांदळाचे पीठ घालावे. उलथन्याच्या टोकाने ढवळावे. नंतर गॅसवर ठेवून चांगली वाफ आणावी. आणखी दोन-चार वाफा काढाव्यात. उकड शिजल्यावर पातेले खाली उतरवून ठेवावे. त्यावर झाकण ठेवावे.एका ताटात दोन मोदकाला घेतो तेवढी उकड काढून घ्यावी. त्याचे ३ भाग करावेत. प्रत्येक भागात पिवळा, हिरवा, लाल रंग घालून मळावे व बाजूला ठेवावे.दुसऱ्या ताटात थोडी उकड काढून घ्यावी. तेलाच्या हाताने मळून घ्यावी.
एका मोदकासाठी घेतो तेवढी उकड हातात घ्यावी. रंगीत गोळ्यापैकी प्रत्येक रंगाची वाटाण्याएवढी गोळी घ्यावी. ती हाताने लांबट करून पांढऱ्या गोळ्याला चिकटवावी. नंतर नेहमीप्रमाणे पिठाच्या गोळ्याला वाटीसारखा आकार देऊन सारण भरावे. कडा चिमटीने बंद करून मोदकाचा आकार द्यावा. असे सात-आठ मोदक झाले, की मोदकपात्रातील चाळणीवर एक ओला कपडा घालून त्यावर मांडावे. मोदकपात्रातील पाण्याला उकळी आली, की मग मोदकाची चाळणी त्यात ठेवून झाकण ठेवावे. पाच-सात मिनिटे वाफवावे. नंतर मोदक बाहेर काढावेत.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
छायाचित्र : इंटरनेटवरुन
Leave a Reply