नुकतीच कोजागिरी झाली आता घरोघरी सुरु झाली तयारी फराळाची.
आश्विन व कार्तिक महिन्यात आपला अग्नि प्रदिप्त झालेला असल्याने असे सर्व पदार्थ पचवण्याची शरीराची क्षमता असते. बाहेरील वातावरण थंड असल्याने भूक वाढलेली असते व शरीरासही अशा पौष्टिक पदार्थांची गरज असते. सणवारांच्या यादीमधील दिवाळी हा शेवटचा मोठा सण. दिवाळी म्हटले की नवीन कपडे, नवीन वस्तू व दागिन्यांची खरेदी आणि त्यासोबत विविध पदार्थ पोटभर खाण्याची एक संधीच. विविध पदार्थयुक्त फराळ हे महाराष्ट्रातील दिवाळीचे एक वैशिष्ट्य होय. फराळाचे पदार्थ बनवताना कारंजी, बेसन लाडू, रवा-नारळ लाडू, चंपाकळी, चकली, चिवडा, गोड शंकरपाळे, खारे शंकरपाळे, शेव, अनारसे, बर्फी ई पदार्थ बनवले जातात. आजकाल अनेकदा हे फराळाचे पदार्थ वेळे अभावी आयते मागवले जातात. पण घरी केलेल्या फराळाची मजा काही औरच दिवाळीच्या फराळाची तयारी आगोदरच करावी म्हणजे आयत्यावेळी काही गडबड होणार नाही. आपल्याला फराळाचे कोणते पदार्थ बनवायचे आहेत ते ठरवा व त्यासाठी कोणकोणते जिन्नस लागणार आहेत ह्याची अगोदरच यादी करा व त्याप्रमाणे जिन्नस आणून ठेवा. या वेळेला घरीच फराळ करायचे निश्चित करा…
उदा.
वेलचीपूड : वेलदोडे आणून तवा गरम करून वेलदोडे थोडेसे गरम करून घेवून साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. मग पूड घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी व फराळ जेव्हा बनवायचा तेव्हा वेलचीपूड वापरावी म्हणजे त्याच्या सुवास तसाच राहील.
बेसन : चण्याची डाळ आणून त्याचे डोळे असतील तर काढावे व चांगले ऊन देऊन डाळ दळून आणून बेसन घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावे.
करंजीचे सारण : नारळ खोवून करंजीचे सारण आधल्या दिवशीच बनवून ठेवावे.
चकलीची भाजणी : चकलीची भाजणी बनवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावी.
चिवडा बनवण्यासाठी : कुठला चिवडा करणार हे आधी ठरवावे, शेंगदाणे भाजून सोलून ठेवावेत. गोटा खोबऱ्याचे पातळ काप करून ठेवावेत. चिवड्याचा मसाला बनवून ठेवावा.
पिठीसाखर : लाडू बनवण्यासाठी साखर बारीक करून ठेवावी.
ड्राय फ्रुट : काजू-बदामचे पातळ काप करून ठेवावे. लाडू बनवण्यासाठी थोडे कुटून ठेवावेत.
अनारसा : अनारसे बनवण्यासाठी आगोदरच अनारसाचे पीठ बनवून ठेवावे. पोहे, रवा, मैदा, पिठीसाखर हे ताजे आणूनच वापरावे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply