फ्लॉवर-मटार करंजी
साहित्य:- २५० ग्रॅम फ्लॉवर बारीक चिरुन , २५० ग्रॅम ताजे कोवळे मटार , फोडणीसाठी तेल,मोहरी,तिखट,हळद चवीनुसार मीठ,वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबिर,ओला नारळ अर्धी वाटी,तीन वाट्या कणीक, एक वाटी बेसन, एक चमचा जीरे.
कृती:- गॅसवर एका कढईत फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल तापवून मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यावर बारीक चिरलेला फ्लॉवर आणि मटार घालावे. त्यात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घालून, बेताचे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी. मटार नीट शिजले की ओला नारळ घालून परतावे. भाजीतील सर्व पाणी आटले पाहीजे. मग त्यावर भरपूर (आवडी नुसार) कोथिंबीर घालून, नीट मिसळून, भाजी खाली उतरवावी. कणीक व बेसनात हळद, जीरे व चवीनुसार तिखट, मीठ, घालून पाणी घालून पीठ भिजवावे. गॅसवर एका कढईत तळणीसाठी तेल तापत ठेवावे.
कणीक-बेसनाची एक पुरी लाटावी.. त्यात २ टेबलस्पून फ्लॉवर मटारची भाजी भरून पुरीच्या दोन्ही कडा जुळवून घ्याव्यात. त्याची कडा नीट बोटाने चेपून सीलबंद करून कातण्याने काताव्या.
आता ही करंजी मध्यम आंचेवर तळून घ्यावी. ह्या करंज्यांबरोबर इतर काही लागत नाही. थोडा बदल हवा असेल तर सारणात उकडलेला बटाटा कुस्करून घालता येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पातीकांदा बटाटा करंजी
साहित्य:- ६ ते ८ पातीकांद्याच्या काड्या, १ मध्यम बटाटा, १ चमचा तेल फोडणीसाठी, १/४ चमचा जीरे, १/४ चमचा हिंग, १/२ चमचा चाट मसाला, १/२ चमचा धणेपूड, १/४ चमचा जिरेपूड, १/२ चमचा लाल तिखट, २ चिमटी गरम मसाला, २ हिरव्या मिरच्या बारीक चीरून, चवीपुरते मीठ, किसलेले चीज, तळण्यासाठी तेल,
पारीसाठी:- १ वाटी मैदा, १ चमचा कणिक, १ चमचा तेल मोहनासाठी, २ चिमटी मीठ.
कृती:- बटाटा उकडून सोलून घ्यावा. सुरीने अगदी बारीक तुकडे करावे. कांद्याची पात आणि त्याचा कांदा दोन्ही बारीक चिरून घ्यावे. पारीसाठी मैदा, कणिक आणि मीठ एकत्र करावे. त्यात १ चमचा गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात जीरे आणि हिंग फोडणीस घालावे. त्यात मिरची घालून परतावे. नंतर पाती कांदा आणि मीठ घालावे. परतून मंद आचेवर २-४ मिनिटे वाफ काढावी. नंतर बटाटा घालून मिक्स करावे. आच बंद करून त्यात चाट मसाला, धणे-जिरेपूड, लाल तिखट, गरम मसाला घालून मिक्स करावे. पारीच्या दिड इंचाचा गोळ्या बनवाव्यात. लाटून त्यात अर्धा ते एक चमचा सारण घालावे. १ चमचा चीज घालावे. पारी बंद करून करंजीचा आकार द्यावा. तेल गरम करून त्यात करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. टॉमेटो केचप बरोबर सर्व्ह कराव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ब्रेडची करंजी.
साहित्य : १ वाटी खोवलेला ओला नारळ, पाव वाटी साखर, पाव वाटी बारीक चिरलेला खजूर, चिमुटभर वेलची पावडर, १ चमचा काजू-बदामाचे तुकडे, ६-७ ब्रेडच्या स्लाइस, १ चमचा मैदा, तळण्यासाठी तेल किंवा तूप. (प्रत्येकी पाउण वाटी तेल आणि तुपाचं मिश्रणही छान लागतं.)
कृती : नारळात साखर घालून मिश्रण ढवळून ठेवावं. १०-१५ मिनिटांनी जाड बुडाच्या पातेल्यात मिश्रण दोन मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवावं. नंतर गॅस बारीक करावा. अधून मधून मिश्रण ढवळत राहावं. साखरेचा पाक होऊन मिश्रण सैलसर झालं की वेलची पावडर, काज-ूबदाम, खजुराचे तुकडे घालून मिश्रण ढवळून घ्यावं. मिश्रण थोडं कोरडं वाटलं की गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावं. मैद्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची घट्टसर पेस्ट बनवून ठेवावी. ब्रेडच्या कडा काढून टाकाव्यात. ब्रेड किंचित ओलसर करून घ्यावा. त्यावर मधोमध दोन चमचे सारण ठेवावं. कडांना मैद्याची पेस्ट लावून ब्रेड त्रिकोणी आकारात दुमडून (फोल्ड करून) कडा जुळवून व्यवस्थित दाबून घ्यावं. तयार करंजी लगेच गरम तेला-तुपाच्या मिश्रणात लालसर रंग येईपर्यंत तळून व्यवस्थित निथळूृन घ्याव्यात. करंज्यांचं सारण आदल्या दिवशीही करून ठेवता येऊ शकतं. सारण तयार असलं तर करंजी खूपच झटपट होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply