मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात.
यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका.
झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती (त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून घ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.
Leave a Reply