आजचा विषय काजू

सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो. इंग्रजीमध्ये कॅश्यूनट म्हणून प्रसिद्ध असलेले काजू अनाकाíडसी कुळातील आहे. दक्षिण भारतात समुद्रकिनारी तर गोवा, तामिळनाडू, केरळ, ओरिसा व महाराष्ट्रातील कोकणामध्ये काजूची झाडे आढळून येतात. बी फोडल्यानंतर आत काजू गर निघतो व हा काजूगर म्हणजेच काजू! हा काजू फळाच्या पूर्णत: बाहेर असतो. काजू फळही सुवासिक, रसाळ व पातळ सालीचे असते. आरोग्याच्या दृष्टीने तेही खाण्यास उत्तम आहे. याच्या रसाचे सरबतदेखील करतात.

काजूचे औषधी गुणधर्म. सुकलेले काजू चवीला अत्यंत गोड, किंचित कषाय, मधूर विपाकी, उष्ण वीर्यात्मक व पित्तकर आहेत. तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्व, तंतूमय, पिष्टमय पदार्थ , खनिजे, मेद अशी सर्व घटकद्रव्ये त्यात असतात.

काजूचे उपयोग. रोज पहाटे उपाशीपोटी ४ काजू मधासोबत खावे. स्मरणशक्ती व बुद्धी वाढण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. काजूचे पिकलेले फळ, सुंठ, मिरे व संधव घालून खाल्ल्यास पोटदुखी कमी होते. तसेच पोटात गुब्बारा धरणे, शौचास साफ न होणे ही लक्षणे कमी होतात. भिजविलेल्या मनुक्यासह ४-५ काजू रोज सकाळी खाल्ल्यास मलावरोध दूर होतो. एखादी गाठ झाली असेल ती पिकण्यासाठी काजुच्या कच्च्या फळांचा गर उगाळून काखेतील गाठीवर लावावा. यामुळे ती गाठ लवकर पिकून फुटते व त्वरीत आराम मिळतो. पायांना भेगा पडल्या असतील तर काजूचे तेल लावून पायात मोजे घालावेत, काही दिवसातच भेगा नाहीशा होतात. काजू पित्तकर असल्याने तो नेहमी अंजीर, बदाम व मनुका या सोबत खाल्ल्याने उष्णतेचे विकार होत नाहीत. काजूमध्ये ‘ब’ जीवनसत्व जास्त प्रमाणात असल्याने भूक मंद झाली असेल तर रोज सकाळी अर्धा कप दुधातून ४-५ काजू बारीक करून घ्यावेत. यामुळे अग्नी प्रदिप्त होऊन भूक लागते. थकवा व नराश्य आल्यास नियमित काजू सेवन करावे यामुळे मज्जासंस्था उत्तेजित होऊन शरीर कार्यक्षम बनते. रक्ताची कमतरता झाली असेल तर रोज ४ ते ५ काजूचे सेवन करावे. यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

वृद्धत्व टाळून चिरतारुण्य टिकविण्यासाठी व शरीर काटक व प्रमाणबद्ध करण्यासाठी काजूचे सेवन नियमितपणे करावे.
काजू खाताना सावधानता. काजू हे उष्णगुणात्मक असल्याने ते अगदी (४ ते ५) प्रमाणातच खावेत. जास्त प्रमाणात खाल्ल्यास उष्णतेचे विकार होण्याची शक्यता असते. त्यात मेदाम्ले आधिक असल्याने अति प्रमाणात खाल्ल्यास अपचन होऊन वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. मधुमेह, हदयविकार, रक्तदाब, आंत्रव्रण, आम्लपित्त या तक्रारी असलेल्यांनी काजू जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही पदार्थ काजूचे
काजू करी
साहित्य : ५० ग्रॅम खरबूज आणि टरबुजाच्या बी, १०० ग्रॅम खसखस, ६० ग्रॅम खोबरे, ५०० ग्रॅम कांदा, १/२ टोमॅटो, ५० ग्रॅम काजू, ५० ग्रॅम चारोळी, १०० ग्रॅम खवा.
कृती : खसखस, खरबूज, टरबूज, खोबरे, काजू (२५ ग्रॅम), चारोळी यांना वाटावे. टोमॅटो व कांद्याला चिरून तळून वाटून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात जिरे व आलं घालून परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट व वाटलेले काजू टाकावे. २ मिनिटाने कांदे व टोमॅटोचा मसाला टाकावा. खवा घालावा. २ चमचे गरम मसाला आरी थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ टाकून काजू आणि कोथिंबीराने सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बटाटे घालून ओल्या काजूची भाजी
साहित्य: पाव किलो सोललेले ओले काजूगर, २ कांदे, २ बटाटे, १ टोमॅटो, अर्धा ओला नारळ किसून, लसुण, आले, गरम मसाला पावडर, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर, तेल.
कृती: काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घ्या.
चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्या. नंतर भाजलेल्या कांदा – खोबर्याटचे वाटण करुन ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्या. एक उकळी आणा. उतरताना गरम मसाला पावडर घालावी व परत एक उकळी आणा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काजूची उसळ
साहित्य: पाव किलो ओले काजू, वाटणासाठी. २ टेस्पून ताजा नारळ + १/४ कप कोथिंबीर + २ ते ३ टेस्पून पाणी, १ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार, २ टीस्पून तेल, फोडणीसाठी: २ चिमटी मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून चिंचेचा घट्ट कोळ, २ टीस्पून चिरलेला गूळ, चवीपुरते मीठ.
कृती: ओले काजू वापरत असाल तर साले काढून टाकावीत. जर ओले काजू नसतील तर वाळवलेले काजू कोमट पाण्यात ८ ते १० तास भिजत घालावेत. कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात काजू, मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करावे. आच मंद ठेवावी. झाकण ठेवून ५ मिनिटे काजू शिजू द्यावेत. कढईत तळाला काजू चिकटू नयेत म्हणून एक-दोनदा ढवळा. ५ मिनिटानी नारळ-कोथिंबीर पेस्ट आणि चिंचेचा कोळ घालावा. २ मिनिटे परतून त्यात काजू बुडतील इतपत पाणी घालावे. झाकण ठेवून काजू शिजू द्यावेत. पाणी जर आटले तर अजून थोडे पाणी घालावे. काजू शिजले कि त्यात गूळ घालून २-३ मिनिटे मंद आचेवर उकळी काढावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काजूवडी
साहित्य: काजू पूड सव्वा वाटी, अर्धी वाटी साखर, पाव वाटी दूध, साजूक तूप १ चमचा.
कृती: मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात १ चमचा तूप, काजूपूड, साखर व दूध घालून लगेचच हे मिश्रण कालथ्याने ढवळायला घ्या. सतत एकसारखे सर्व बाजूने ढवळत रहा. काही वेळाने मिश्रण कोरडे होऊ लागेल. ढवळताना कालथा जड लागायला लागेल. मिश्रण कोरडे होऊन जवळ येईल व गोळा होईल. एका ताटलीला थोडे साजूक तूप लावा व हे मिश्रण त्यावर घालून सर्व बाजूने एकसारखे थापा. कोमट असताना वड्या पाडा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*