पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी पाहिजेच. कट म्हणजे पुरण शिजल्यावर जास्तीचे काढलेले पाणी होय. कटाची आमटी ही एक अप्रतिम महाराष्ट्रातील लोकांची खास डिश आहे. कटाची आमटी ही आंबटगोड लागते. ती पुरणपोळीबरोबर किंवा गरमगरम भाताबरोबर सर्व्ह करतात. ही आमटी नुसती खायला पण सुंदर लागते. पुरणपोळी आणि कटाची आमटी खातात. पुरणपोळी चण्याच्या डाळीची, शिवाय गोड. चण्याच्या डाळीने काही जणांना पित्त होते, पोटात वायू धरतो, जडत्व येते. त्यात साखरही भरपूर असल्यामुळे कफ वाढून सुस्ती येऊ शकते. कटाच्या आमटीत मात्र मसाले भरपूर घातले जातात. तमालपत्र, काळे मिरे, दालचिनी या सर्व मसाल्यांमुळे पुरणपोळी पचायला सोपी होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य. तयार कट आठ वाट्या, लिंबाएवढीच चिंच, अर्धी वाटी गूळ, दोन चमचे मीठ, एकपाव वाटी सुक्याय खोबऱ्याचा कीस, चार लवंगा, एक छोटा चमचा शहाजिरे, 2-3 दालचिनी तुकडे, 2 तमालपत्र, फोडणीकरिता छोटा डाव तेल, हिंग, मोहरी, हळद, छोटा चमचा लाल तिखट, कढीपत्ता, कोथिंबीर छोटा चमचा तयार पुरण.
कृती. कटात चिंचेचा कोळ घालून तो शिजत ठेवावा. त्यात गूळ घालावा. तिखट मीठ घालावे. लवंग, दालचिनी, शहाजिरे व खोबरे तेलावर परतून घ्यावे व गार झाल्यावर त्याची मिक्सठरवर पूड करावी. ती शिजणाऱ्या कटात घालावी. कढल्यात फोडणी तेल मोहरी, हिंग, हळद घालून खमंगपणे फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. तमालपत्र घालावीत. तयार पुरण एक चमचा घालून हलवावे. ही फोडणी आमटीत घालावी. आमटी चांगली उकळून शिजल्यावर गॅस बंद करून कोथिंबीर घालावी.
टीप. या आमटीत शेवग्याच्या शेंगा घालण्याची पद्धत आहे. आवडत असल्यास हिंग हळद, मीठ घातलेल्या पाण्यात शेंगांचे बोटभर लांबीचे तुकडे शिजवून घ्यावेत व ते उकळत्या आमटीत घालावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply