केळीच्या कालाची भाजी
(केळीच्या खुंटाची वरची सोपं काढून टाकल्यावर आत जो कोवळा गाभा राहतो, त्याला ‘काल’ असं म्हणतात. कालाची भाजी आयत्या वेळी करायला घेऊ नये. तसंच काल चिरताना आत दोर आहेत का पहावं. असल्यास ते काढून टाकावेत .)
साहित्य :- केळीचा काल चार वाटया, भिजवलेली मुगाची डाळ अर्धी वाटी, तिखट अर्धा चमचा, गोडा मसाला, ओलं खोबरं, मीठ, गुळ, तेल, फोडणीचं साहित्य.
कृती :- केळीच्या आतला काल , गोल चकत्या काढून पुन्हा बारीक चिरावा. तो पाण्यात टाकावा. दोन-तीन वेळा पाण्यातून चांगला चोळून, धुवून घ्यावा. म्हणजे राप निघून जाईल. घट्ट पिळून त्याला हळद चोळून काही तास दाबून ठेवून द्यावं. त्यानंतर फोडणी करून त्यात भिजवलेली मुगाची डाळ व चिरलेला काल टाकून वाफ आणावी. गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारून डाळ व भाजी नीट शिजू दयावी. त्यानंतर तिखट, गोडा मसाला, चवीनुसार गुळ, मीठ घालून एक-दोन वाफा आणाव्यात. वरून ओलं खोबरं घालावं.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
केळफुलाचे कटलेट
साहित्य : केळफूल निवडून, बारीक चिरून, 4-5 चमचे तेल, 1 मोठा बटाटा उकडून, अर्धा गाजर बारीक चिरून, गव्हाचा ब्रेड – 2 स्लाईस, आले, लसूण, मिरची पेस्ट, धने, जिरे पूड, मीठ.
कृती : चिरलेल्या केळफुलाला कुकरमध्ये हळद व मीठ घालून छान वाफ आणावी. वाफवल्यावर पाणी काढून टाकावे. वाफवलेले केळफूल हाताने बारीक करून त्यात गाजर व उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. आले, मिरची, लसूण पेस्ट, मीठ, धने-जिरे पूड घालावी. ब्रेडचा बारीक चुरा घालून मळून घ्यावे. गोल चपटे कटलेट तव्यावर तेल टाकून खमंग भाजावेत व गरम गरम सर्व्ह करावेत. बरोबर सॉस अथवा हिरवी चटणी छान लागते. चविष्ट , फायबरयुक्त, करण्यास सहज सोपा पदार्थ.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
केळफुलाची भाजी
साहित्य : केळफूल निवडून चिरून, अर्धी वाटी बारीक चवळी (कडधान्य) 8-10 तास भिजवून, ओले खोबरे, कोथिंबीर, 1 कांदा बारीक चिरून, चिंच, मीठ, धने-जिरे पूड, फोडणीसाठी तेल, मोहरी, लाल ओली मिरची 2, लाल तिखट 1 चमचा, काळा मसाला 1 चमचा, गूळ चवीप्रमाणे.
कृती : केळफूल निवडून, धुऊन, बारीक चिरून घ्यावे. कुकरमध्ये 2-3 चिंच बुट्टके घालून केळफूल वाफवावे. भिजलेली चवळी कुकरमध्ये वेगळी वाफवावी. केळफुलातील पाणी काढून टाकावे. पातेल्यात फोडणी करून कांदा परतावा व लाल मिरची/ लाल तिखट घालावे. केळफूल व वाफवलेली चवळी घालून परतावे. चवीप्रमाणे धने-जिरे पूड, काळा मसाला, गूळ, मीठ, खोबरे, कोथिंबीर घालून परतावे. झाकण ठेवून 1 वाफ आणावी.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply