खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजे काय

खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बाय कार्बोनेट अथवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे याचे इंग्रजी रासायनिक नाव आहे. हे एक प्रकारचे मीठ आहे. हा खाण्याचा सोडा अल्कली गुणधर्माचा आढळून येतो. हे पांढऱ्या भुकटीच्या म्हणजेच पावडरच्या स्वरुपात अथवा पांढऱ्या स्फटिक स्वरुपातसुद्या सापडते. ह्या सोड्याला ८० सेल्सियस इतक्या तापमानात उष्णता दिल्यास तो विघटन पावतो आणि त्यातून कार्बन डाय ऑक्साईड वायू अतिशय बुडबुड्याच्या स्वरुपात त्यापासून वेगळा होतो. तसेच खाण्याचा सोडा हा आम्लाच्या संपर्कात आल्यास रासायनिक क्रिया घडते आणि कार्बन डाय ऑक्साइडचे बुडबुडे तयार होण्यास मदत होते.

खाण्याचा सोडा इडली, ढोकळा किंवा केक बनवताना त्याच्या पिठामध्ये वापरला जातो. ढोकळा बनवताना खाण्याचा सोडा वापरला जातो, त्यामुळे ढोकळ्याला जाळी पडते कारण त्या छिद्रातून कार्बन डाय ऑक्साईड वायू निघून गेलेला असतो. म्हणूनच ढोकळा फुगतो आणि हलका होतो. खाण्याचा सोडा वरील पदार्थ बनवताना वापरण्याऐवजी शक्यतो काही नैसर्गिक पर्यायांचा वापर जरूर करू शकतो. खाण्याचा सोडा वापरून पीठ आंबवण्यापेक्षा ते नैसर्गिकरित्या आंबवण्याचा प्रयत्न केल्यास तयार झालेला पदार्थ नैसर्गिक गुणधर्मासहित त्याचा आपल्या शरीराला उपयोग होईल. खाण्याचा सोडा वापरल्याने पदार्थ हलके, खुसखुशीत व्हायला मदत होते. पण खाण्याचा सोडा मर्यादित स्वरूपात वापरणं केव्हाही हितावह आहे.

असा हा जेवणाची लज्जत वाढवणारा खाण्याचा सोडा हा अजूनही विविध कारणांसाठी उपयुक्त आहे. आज आपण खाण्याच्या पदार्थांव्यतिरिक्त खाण्याच्या सोड्याचे विविध फायदे जाणून घेऊयात:

१) केसात कोंडा झालं असल्यास काही दिवस केसाला शाम्पू न लावता खाण्याचा सोडा केसांच्या मुळाशी लावून केस धुतल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.

२) खाण्याचा सोडा केस धुताना वापरल्याने केसांना तसेच त्वचेला चमक मिळते. आंघोळीच्या पाण्यात अर्धा कप खाण्याचा सोडा टाकून ह्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेवरील मृतपेशी निघून जाण्यास मदत होते. तसेच कंडीशनरमध्येही खाण्याचा सोडा मिसळून केस धुतल्याने केंसाची चमक वाढण्यास मदत होते.

३) आपल्या दातांचे पिवळेपण घालवण्यासाठीही खाण्याचा सोडा अतिशय उपयुक्त आहे. ह्यासाठी थोड्या पाण्यामध्ये खाण्याचा सोडा मिसळून बोटाने हळहळू दातांवर मसाज करून नंतर तोंड स्वच्छ धुतल्याने दातांवरील पिवळेपण कमी होण्यास मदत होईल.

४) जर कोणाला ब्लॅकहेडची समस्या असल्यास खाण्याचा सोड्यात थोडं पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवायची. ब्लॅकहेड असलेल्या जागी ही पेस्ट लावून १५ मिनिटानंतर गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. हे नियमित केल्याने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.

५) बगलेतील काळेपणा दूर करण्यासाठी खाण्याचा सोडा पाण्यात भिजवून त्याठिकाणी लावणे. साधारण ५ मिनिटांनी तो भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. आठवडाभर हा उपाय नियमित केल्यास त्याचा परिणाम निश्चितपणे जाणवतो.

६) तोंडाला दुर्गंध येत असल्यास खाण्याचा सोडा वापरून माउथवॉश घरी तयार करून वापरणे उपयुक्त ठरते. त्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात थोडासा बेकिंग सोडा टाकून चमच्याने ढवळून घेणे. हे पाणी माऊथवॉश सारखे वापरून या पाण्याने चूळ भरल्यास, तोंडाला येणारा वास दूर होण्यास मदत होते.

७) उन्हामध्ये कधी कधी आपल्या त्वचेवर डाग पडतात. अशावेळी अर्ध्या लिंबावर खाण्याचा सोडा लावून, हे लिंबू साधारण ३० सेकंद डाग पडलेल्या शरीरातील भागावर चोळल्याने डाग जाऊन त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.

८) पाण्यामध्ये खाण्याचा सोडा मिसळून, ह्या पाण्यामध्ये थोडा वेळ हात भिजत ठेवल्यास नखांचा पिवळेपणा जाण्यास मदत होते.

९) चांदीचे दागिने किंवा भांडी लवकर काळी पडतात. अशावेळी पाण्यात खाण्याचा सोडा मिसळून, ह्या पाण्यामध्ये काळी पडलेले चांदीचे दागिने किंवा भांडी तासभर भिजत ठेवल्यास काळे पडलेले दागिने किंवा भांडी नवीन असल्याप्रमाणे चकाकतात.

 

Avatar
About Sanket 7 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

1 Comment on खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजे काय

Leave a Reply

Your email address will not be published.


*