साहित्य : दहा वाटया भरून चुरमूरे, तीन मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टोमॅटो, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, दोन मुठी खारे दाने, दोन वाटया भरून फरसाण, एक वाटी भरून शेव, अर्धा चमचा जिरेपूड, तिखट आवडत असेल तर हिरवीमिरची आणि पुदिना यांचा मीठ घालून केलेला ठेचा दोन चहाचे चमचे भरून.
कृती : एका स्टीलच्या पातेलीत चुरमूरे घ्या. सुरी वापरता येत नसेल तर कांदे, टोमॅटो, कोथिंबीर सर्व बारीक कापून घ्या नाहीतर आई किंवा ताईकडून कापून घ्या. मूठभर चिरलेला कांदा व थोडी कोथिंबीर बाजूला ठेवून बाकी सर्व चुरमूर्यात घाला. चुरमूर्यात फरसाण, मीठ, जिरेपूड, खारेदाणे, टोमॅटो घाला. हाताने सर्व छान कालवून घ्या. तिखट आवडत असेल तर मिरचीचा ठेचाही त्यात कालवा. प्लेट मध्ये ही कालवलेली भेळ घाला. साधारणत: चार प्लेट गच्च भरून ही भेळ होईल. आता त्यावर मुठीने शेव पेरा. वर थोडा कांदा घाला व शेवटी थोडी कोथिंबीर घाला. फर्मास कोरडी भेळ तयार झाली.
टीप : मिरचीचा ठेचा हाताने कालविल्यास हाताची आग होते. साबणाने हात धुवून टाका. शिवाय तो हात तसाच जर डोळयाला लागला तर डोळयांची खूपच आग होईल हे लक्षात असू द्या.
Leave a Reply