सर्व ऋतूंत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक काय खायला आवडते, असा प्रश्नइ जर विचारला, तर त्याचे एकच उत्तर मिळेल आणि ते म्हणजे आइस्क्रीम व कुल्फी. कुल्फी हा पदार्थच मुळी असा आहे की भारतात कोणत्याही भाषेत, कुठल्याही व्यक्तीसाठी प्रियच आहे. थंडगार, गोड, मजेदार, चविष्ट, वेगवेगळ्या अशा कुल्फीचा उल्लेख केल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही. त्यात जर उन्हाळ्याचे दिवस असतील, तर काही विचारूच नका. हल्ली कुल्फी खाण्यासाठी आता कोणी खास उन्हाळ्याचीच वाट पाहात नाही. बाराही महिने अगदी थंडी-पावसातसुद्धा आइस्क्रीमची चव चाखली जाते.
ड्राय फ्रूट्स कुल्फी
साहित्य : एक लीटर दूध, १०-१२ काजू पाकळ्या, १०-१२ पिस्ते, १०-१२ बदामाचे काप,१०-१२ बेदाणे, २-३ सुक्या अंजिर, २-३ खजूर,७-८ केशराच्या काड्या,एक चमचा विलायची पावडर, एक कप कंडेन्स मिल्क ,एक वाटी खवा,अर्धी वाटी फ्रेश क्रीम, दोन टेबलस्पून साखर,चिमूटभर मीठ,एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर.
कृती : सुके अंजीर व खजूर पाण्यात भिजत घालून ठेवा. एक तासानंतर खजूर व अंजिराचे छोटे छोटे तुकडे करून घ्या व पेपर नॅपकिनवर पसरून टाकून कोरडे करून घ्या. कॉर्नफ्लोर अर्धी वाटी थंड पाण्यात मिसळून एका बाजूला ठेवा. दूध १५-२० मिनिटे उकळून घ्या. उकळत असतांना एकसारखे ढवळत रहा. मग त्यात कंडेन्स मिल्क व खवा घालून चांगले ढवळून मिक्स करून घ्या. नंतर त्यात कॉर्नफ्लोर घातलेले थंड पाणी घालून एक सारखे ढवळत राहून पुन्हा उकळी येईस्तोवर गरम करून घ्या. उकळी येईल असे वाटताच त्यात फ्रेश क्रीम घालून ३-४ मिनिटे उकळून घ्या. आता त्यात विलायची पावडर,केशर,खजूर व अंजिराचे तुकडे,बेदाणे घाला व मिक्स करून घेऊन दोन मिनिटांनी गॅस बंद करा. गॅसवरून उतरून घेऊन जरासे गार झाल्यावर त्यात चिमूटभर मीठ घालून रुम टेंपरेचरला थंड करून घ्या. मग त्यात बदाम,काजू व पिस्ते यांचे काप घाला व मिसळून घ्या. हे मिश्रण १०-१२ कुल्फी मोल्ड्समध्ये ओता. वर पुन्हा थोडे ड्राय फ्रूट्सचे तुकडे घालून झाकण लावून कुल्फी मोल्ड्स स्टँडवर ठेवून सेट होण्यासाठी ८-१० तास डिपफ्रिजमध्ये ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तिरंगी कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा लहान चमचा केशर, दहा-बारा भिजवलेले पिस्ते वाटून, पंधरा-वीस कापलेले पिस्ते.
कृती : दूध उकळून निम्मं झाल्यावर कॉर्नफ्लोअर, साखर व वेलची पूड टाकून उकळा. उकळी आल्यावर ढवळत चार-पाच मिनिटं शिजवा. याचे तीन भाग करा. एकाच पाण्यात विरघळलेलं केशर, एकात पिस्त्यांची पेस्ट व चिरलेले पिस्ते टाका व एक भाग सफेदच राहू द्या. कुल्फीच्या साच्यात खाली पिवळ्या रंगाच्या दुधाचा एक भाग टाका. तो थोडा घट्ट झाल्यावर त्यावर सफेद दुधाचा भाग व तो भाग घट्ट झाल्यावर पिस्ता टाकलेल्या दुधाचा हिरवा भाग टाकून फ्रीजरमध्ये सेट करून द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चॉकलेट चिप्स कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, अर्धा प्याला चॉकलेटचे कापलेले तुकडे, अर्धा प्याला चॉकलेट सॉससाठी, एक मोठा चमचा प्रत्येकी लोणी, कॉर्नफ्लोअर व कोको पावडर, दोन मोठे चमचे साखर, अर्धा प्याला दूध.
कृती : सॉस बनवण्यासाठी लोणी गरम करा. त्यात कॉर्नफ्लोअर व कोको पावडर मिसळा. थोडं परतून दूध टाका आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. साखर टाकून थंड करा. दूध निम्मं होईपर्यंत उकळा. त्यात साखर व कॉर्नफ्लोअर मिसळून घट्ट होऊ द्या. थंड झाल्यावर चॉकलेटचे तुकडे टाका आणि साच्यात टाकून सेट करा. चॉकलेट सॉस टाकून खायला द्या. हवं तर चॉकलेटचा कीस टाकून सजवू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काजू बदाम कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा हिरव्या वेलचीची पूड, प्रत्येकी वीस चिरलेले काजू व बदाम.
कृती : दूध घट्ट होईपर्यंत उकळा. निम्मं झालं की त्यात साखर, वेलची व कॉर्नफ्लोअर दोन चमचे पाण्यात विरघळून दुधात टाका. ढवळत उकळी येईपर्यंत शिजवा. मग मंद आचेवर 3-4 मिनिटं ढवळत शिजवा. थोडं थंड होऊ द्या. आता कुल्फीच्या साच्यात बदाम व काजूसह भरा. फ्रीजरमध्ये आठ-दहा तास ठेवा आणि सेट होऊ द्या. प्लेटमध्ये काढून थोडे आणखी बदाम व काजूने सजवून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
जेली कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धे पाकीट लाल रंगाची जेली.
कृती : जेली गरम पाण्यात घोळवून फ्रीजरमध्ये सेट करून घ्या व तुकडे कापा. थोडी जेली बाहेरच
ठेवा. दूध उकळून निम्म झाल्यावर साखर व कॉर्नफ्लोअर टाका. उकळी आल्यावर चार-पाच मिनिटं शिजवा. थंड झाल्यावर जेलीचे तुकडे मिसळा. साचे फ्रीजरमध्ये थंड करून त्यात विरघळलेली जेली टाकून सेट करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ताज्या फळांची कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, चिमूटभर दालचिनी पूड, एक संत्रं, एक सफरचंद, वीस चिरलेली हिरवी द्राक्षं.
कृती : दूध उकळून निम्मं झाल्यावर पाण्यात घोळवून कॉर्नफ्लोअर, साखर व दालचिनी टाका. उकळी आल्यावर ढवळत चार-पाच मिनिटं शिजवा. थंड झाल्यावर फळं मिसळा आणि साच्यात सेट करा. संत्रं व सफरचंदासह सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply