‘ट्रायगॉनेला फेनम ग्रेसम’ असं शास्त्रीय नाव असलेली मेथी संस्कृतमध्ये मेथिक, बहुपत्रिका वगैरे नावांनी ओळखली जाते. तिच्या संस्कृतमधील नावावरूनच मेथी हे मराठीतलं नाव रूढ झालं असावं. मेथी या पालेभाजीची पाने, बिया (मेथ्या), तसेच सुकवलेली मेथी म्हणजेच कसुरी मेथी या सर्वांचा स्वयंपाकात उपयोग केला जातो. मेथी मध्ये ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘ई’ व ‘के’ या जीवनसत्त्वांच्या खजिन्यासह फॉलिक अॅतसिडसुद्धा आहे. मेथी व तिच्या बिया या अत्यंत औषधी समजल्या जातात. मेथ्या या उत्तम प्रथिनयुक्तड व यकृतसंरक्षक आहेत. लिव्हरच्या पेशींना सक्षम करण्यासाठी यांचा उपयोग होतो. मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे. मेथीत तंतुमय पदार्थ भरपूर असल्यामुळे मेथीची भाजी कमी खाऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या लोकांच्या आहारात मेथी चांगली. तोंड येणे, घसा बसणे अशा तक्रारींमध्ये मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम लाभतो. मातांना दूध चांगले येण्यासाठी मेथीची भाजी व बाजरीची भाकरी देण्याची बऱ्याच प्रांतांत पद्धत आहे. मेथी ही क्षार व जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असल्याने गर्भवती, तसेच बाळंतिणींना ही भाजी अत्यंत हितावह आहे. गरोदर स्त्रियांसाठी बाळाची वाढ चांगली व्हावी यासाठी, तसेच बाळाच्या आरोग्यात जन्मत: उद्भवू शकणारे दोष टाळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. त्वचेवर होणारा बुरशीचा व जीवाणूसंसर्ग कमी करण्यासाठी मेथी चांगली असल्यामुळे ती पोटातून घेण्याबरोबरच मेथीच्या पानांचा रस त्वचेवर पुरळ आलेल्या किंवा खाज येणाऱ्या भागावर लावता येतो. मधुमेही लोकांना मेथीचा होणारा उपयोग हा सर्वश्रुत आहेच. मधुमेहीं व्यक्तींनी गव्हाच्या पिठात मेथ्यापूड घातल्यास रोजच्या पोळ्यांमधून मेथीचा फायदा त्यांना मिळू शकतो. साधारणत: गव्हाच्या ५ किलो पिठात १०० ग्रॅम मेथ्यांची पूड घालावी. हे प्रमाण आवश्यंकतेनुसार वाढवताही येते. वरणासाठी डाळ शिजवतानाही १०-१२ मेथ्यांचे दाणे त्यात घालावे. मेथी ही टाइप-१ व टाइप-२ अशा दोन्ही प्रकारच्या मधुमेहात उपयुक्तॅ ठरते. मेथीमध्ये इन्सुलिनचे कार्य वाढवण्याचे गुणधर्म आहेत. मेथी ही स्तनांचा व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी करते, असे तज्ज्ञ मानतात. जी मंडळी स्थूल आहेत व ज्यांचे मांसाहार खाणे अधिक आहे अशांनी मेथीसारख्या पालेभाज्या रोजच्या खाण्यात ठेवाव्यात. मेथी सौंदर्यवर्धक देखील आहे. चेहऱ्यावर तारुण्यपीटिका किंवा ब्लॅकहेड्स अधिक प्रमाणात येत असल्यास मेथीच्या पानांची पेस्ट चिमूटभर हळद घालून त्याचा चेहऱ्यास पॅक लावावा. सुरकुत्या कमी करण्यासाठी दुधात मेथीच्या पानांची पेस्ट एकत्र करून चेहऱ्यास लावावे. केसांचे गळणे कमी करण्यासाठी घरी काढलेले नारळाचे दूध व मेथीच्या पानांची पेस्ट एकत्र करून आठवड्यातून दोन वेळा केसांना लावल्यास फायदा मिळतो. आहारामध्ये मेथ्यांचे प्रमाण वाढवल्यास केसांच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून येतो. १ वाटी मेथीच्या सुक्याे भाजीत ५८ उष्मांक व २ ग्रॅम चरबी असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मेथीचे काही पदार्थ
मेथीच्या भाजीतले दिवे
मेथीची गोळा भाजी
मेथीची ताकातली भाजी
डाळमेथी
मेथीच्या वड्या
मेथी मुठिया
मेथीची भजी
Leave a Reply