ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. काजू सोलताना अंगठ्याची नखं चिकानं(डिंकानं) थोडी खराब करायची तयारी असेल की झालं तर. बसल्या जागी किती खाल्ले ह्याचा हिशोबाच लागत नाही. आणि उन्हाळ्यात काजू उसळीची मेजवानी असतेच.
साहित्य :
१) १ वाटी ओले काजु
२) १ मोठा कांदा
३) हळद
४) २ छोटे चमचे मालवणी मासाला
५) ५-६ कढीपत्त्याची पाणे
६) आलं लसुन पेस्ट
७) एक वाटी ओला खोबर
८) २ छोटे चमचे तेल
९) कोथिंबीर
१०) आवडीनुसार मिठ ..
कृती :
ओले काजु थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील. (ओले काजु उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत.)
सालं काढून काजू पाण्यात स्वच्छ चोळून धुऊन घ्यावेत.
एका भांडयात तेल गरम करून कढीपत्ता,आलं लसुन पेस्ट व बारीक चिरलेला अर्धा कांदा घालावा, लालसर भाजला की त्यात काजु आणि मालवणी मसाला घालुन चांगले परतून घ्यावे.
थोडेसे पाणी घालुन ५ मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ दयावी.
दुसरीकडे एका भांडयात थोडस तेल घेऊन कांदा भाजून ओल खोबर लालसर करून घ्यावं. वाटण थंड झाल की मिक्सरला लावून बारिक वाटुन घ्यावे.
काजु शिजल्यावर वाटण घालावे. ५ मिनिट व्यवस्थित शिजेपर्यंत झाकण ठेवावे.
वरून छान कोथिंबीर पेरून पोळी/भाकरी किंवा भाताबरोबर ओल्या काजूची उसळ वाढावी…
टीपा:
१) ओल्या काजूच्या चवीला खरंतर तोड नाही. तरीही उपलब्ध नसल्यास सुके, न खारवलेले काजू २ तास पाण्यात भिजवून वापरावेत.
२) या उसळीत बटाटा छान लागतो.
३) बदल म्हणून चिंचेऐवजी टॊमेटो घालून बघावा.
४) काळा मसाला घालूनही ही उसळ चांगली होते.
५) सालं काढून काजू फ़्रीजर मध्ये ठेवले तर महिनाभर चांगले रहातात.
दुसरी सोपी पद्धत अशी:
२ टेबलस्पून तेलात १ चमचा मोहरी, १ चमचा हळद आणि १/४ चमचा हिंगाची नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात ३ हिरव्या मिरच्या चिरून घालाव्यात.
१ १/२ कप काजू आणि पाणी घालून शिजू द्यावे.
ओला नारळ नुसताच किंवा वाटून घालावा. मीठ, गूळ किंवा साखर घालावी. कोथिंबीर पेरून वाढावी.
उपासासाठी ओल्या काजूच्या उसळीची पद्धत अशीच फक्त त्यात तेला ऐवजी तूप घ्यावे आणि हळद व हिंग घालू नये.
Leave a Reply