हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुनही करता येते.
एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची(सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला.थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला.(कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल, ते लिहितोच)गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता मंद आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी भाजा. कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी हे तंत्र वापरता येईल.
Leave a Reply