खरं तर पोश्तो हा बंगाली शब्द, म्हणजे आपली खसखस हो. फार चविष्ट पदार्थ होतात ह्या खसखसी ने. खीर काय, शिरा काय, भाज्यांची ग्रेव्ही काय आणि आता आज जी पाहणार ती बटाट्याची भाजी. मी ही भाजी पहिल्यांदा खाल्ली त्याला १५ एक वर्ष तर झालीच असतील. माझ्या एका मैत्रिणीने मला शिकवली. तेंव्हा पासून माझ्या मनात घर करून बसली ही भाजी. करायला अतिशय सोपी, तेवढीच चविष्ट आणि ह्यात प्रकार पण करता येतात. जसं आलू पोश्तो, पटोल पोश्तो म्हणजे परवल ची भाजी, बैगन पोश्तो इत्यादी. आज बघू या आलू पोश्तो.
साहित्य : बटाटे 4 मोठ्या आकाराचे, खसखस एक वाटी भिजवून, कांदे दोन मध्यम, हळद अगदी चिमूटभर, जिरे पूड एक चमचा, मिरे पूड अर्धा चमचा, लाल तिखट पाव चमचा, मीठ चवीप्रमाणे, तेल, जिरे, मोहरी फोडणी साठी
कृती : बटाटे सोलून आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करून घ्या. मी लांबूळके कापून घेतले. भिजलेली खसखस मिक्सरवर वाटून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करून आधी बटाटे जरा परतवून घ्या. उरलेल्या तेलात थोडे तेल घालून, जिरे मोहरीची फोडणी करून कांदा परतवून घ्या. कांदा मऊ झाला की त्यात कोरडे मसाले घालून मिनिटभर परतवून घ्या. मग त्यात वाटलेली खसखस घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. पाणी घालून परतलेले बटाटे घालून छान उकळू द्या. ह्याला खूप रस्सा भाजी सारखा पातळ रस्सा नाही ठेवायचा, अंगाबरोबर रस हवा. मीठ घालून एक उकळी आली की गॅस बंद करा. तुमची भाजी तयार. बस वरून आपली लाडकी कोथिंबीर पेरा. फार तिखट नाही, खूप मसाले पण नाही पण अतिशय चविष्ट भाजी तयार. पोळी, पराठा, भात बरोबर छानच लागते.
काही टिप्स
१. भाजीचा रंग पांढरट आहे, त्यामुळे हळद बेताने घालावी.
२. पांढऱ्या मिरीची पूड सगळ्यात योग्य ह्या भाजीला, पण ती सहज उपलब्ध नसते म्हणून मी मिरी पूड आणि तिखट दोन्ही घालते.
३. बटाट्या प्रमाणे, परवल किंव्हा वांग घालूनपण ही भाजी छानच लागते.
सोनाली तेलंग
Leave a Reply