साहित्य – 2 वाट्या रात्रभर भिजवून सकाळी शिजवून घेतलेला लाल राजमा, 1 कांदा बारीक चिरून, 5-6 लसूण पाकळ्या बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (अथवा 2 मोठे टोमॅटो गरम पाण्यात अर्धा मिनीट ठेवून बाहेर काढावेत, म्हणजे त्याची साले निघतील. साले काढून टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.), अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ व थोडी साखर, थोडे तेल.
भाज्या बनविण्यासाठी – फ्लॉवर, राजमा, गाजर, बेबी कॉर्न, मशरूम यांचे तुकडे दोन वाट्या शिजवून घ्यावे. 1 कांदा, एक सिमला मिरची बारीक चिरावी. मीठ, मीरपूड तसेच 1 मोठा चमचा बटर घ्यावे. टोबॅस्को अथवा चिली सॉस एक चमचा घ्यावा.
व्हाइट चटणीसाठी – 1 चमचा लोणी, 2 मोठे चमचे मैदा किंवा कणीक, 1 ते दीड कप दूध, मीठ, मीरपूड, 1 वाटी किसलेले चीज.
कृती – प्रथम एका पातेल्यात थोडे तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे सर्व परतून घ्यावे. त्यात टोमॅटोची प्युरी घालून नीट ढवळावे. नंतर त्यात जिरेपूड, मीठ, साखर घालून त्यात शिजवलेला लाल राजमा घालून हे मिश्रण तयार करून ठेवावे.
दुसऱ्या पातेल्यात लोणी वितळवून त्यात कांदा व सिमला मिरची परतून घ्यावी. त्यात शिजवलेल्या सर्व भाज्या, मीठ, मीरपूड घालावे. थोडा सॉस मिसळावा. नंतर व्हाईट सॉस बनवून घ्यावा. त्यासाठी 1 चमचा लोण्यात मैदा किंवा कणीक परतून घ्यावी. त्यात दूध घालून सतत ढवळावे, नाही तर गुठळ्या होतील. लागल्यास दूध आणखी थोडे घालावे. चवीनुसार मीठ व मीरपूड घालावी. बेकिंग डिशमध्ये थोडे लोणी सगळीकडे पसरून लावावे. प्रथम तयार केलेल्यालाल राजम्याचा थर पसरावा. त्यावर तयार केलेल्या भाज्या घालाव्यात. त्यावर व्हाइट सॉस घालून सगळीकडे नीट पसरावे. शेवटी त्यावर किसलेले चीज पसरून ओव्हनमध्ये 12 ते 15 मिनिटे बेक करून घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply