सातूचे पीठ

सातूचे पीठ कसे करावे आणि त्यापासून बनणारे विविध पदार्थ. ही माझ्या पणजीची डिश आहे
लागणारा वेळ: १ दिवस
लागणारे जिन्नस:सातूचं पीठ तयार करण्याकरता: अर्धा किलो गहू, अर्धा किलो पंढरपुरी डाळवं (चिवड्यात वापरतो ते), अर्धा चमचा (टी-स्पून) सुंठ पूड, पाव चमचा (टी-स्पून) वेलची पावडर.

पुढील कृती करता: तिखट प्रकार, तयार सातूचं पीठ अर्धी ते एक वाटी, पाव ते अर्धी वाटी जाडे पोहे, २ काकड्या, हवा असेल तर एक कांदा, आवडत असेल तर एखादी हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर आणि लाल तिखट (तिखट मसाला नको), मोसमात असेल तर अर्धी कैरी.

गोड प्रकार:
गोड पीठ
– तयार सातूचं पीठ अर्धी ते एक वाटी
– आवडीनुसार गूळ
– दूध किंवा पाणी
– आवडत असेल तर थोडं खवणून घेतलेलं ओलं खोबरं किंवा जरासा सुक्या खोबर्‍याचा कीस

लाडू
– तयार सातूचं पीठ एक वाटी
– साखर आवडीप्रमाणे
– तूप

क्रमवार पाककृती:
पीठ तयार करण्याची कृती:
– गहू धूवून जरावेळ (१०-१५ मिनिटं) भिजवून नंतर कपड्यावर काढून निथळावेत.
– जरा ओलसर असतांनाच खल-बत्याच्या मदतीनं हलक्या हातानी कांडून, फोलपटं काढावीत
– नंतर हे फोलपटं काढलेले गहू पूर्ण वाळवावेत
– वाळलेले गहू लोखंडी कढईत मंद आचेवर खमंग, लालसर भाजावेत
– आता भाजलेले गहू + पंढरपुरी डाळवं घरगुती चक्कीवरून दळून आणावेत
– डाळवं खुटखुटीत नसेल तर तेही जरा शेकवून घ्यावेत (हे भाजायचे नाहीत)
– तयार झालेल्या पिठात सुंठपूड आणि वेलचीची पूड घालून एकदा चांगलं मिसळावं आणि मग चाळून घ्यावं.
– ते पीठ तयार झालं
– कोरड्या बरणीत/डब्यात भरून ठेवावं आणि लागेल तसं वापरावं. पुष्कळ दिवस टिकतं हे.
या पिठापासून पुढे दिलेले प्रकार करता येतील.

तिखट प्रकार
– पोहे जरा तेलावर भाजून, कुरकुरीत करून घ्यावे
– काकडीची सालं काढून, कोचवून घ्यावी
– कांदा (वापरत असाल तर), हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी
– कैरी असेल तर तीही अगदी बारीक चिरावी
– आता पिठात तळलेले पोहे, काकडी, कैरी, कांदा, मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर आणि लाल तिखट घालून नीट मिसळून घ्यावं
– जरा सुटंसुटंच राहातं हे पण खायला भारी चविष्ट प्रकार. खातांना चमच्यात थोडासाच घेऊन खावा, नाहीतर पार चिकट तोंड होईल आणि तोठरा बसेल.

गोड प्रकार:
गोड पीठ
– तयार सातूच्या पिठामध्ये बारीक चिरलेला गूळ, दूध, मिठाची कणी आणि आवडत असेल तर ओलं/सुकं खोबरं घालून दाटसर पळीवाढी कन्सिटंसीचं करावं
– वाटीत घेऊन चमच्यानी किंवा थेट वाटीनीच प्यावं

लाडू
– सातूच्या पिठात चवीप्रमाणे पिठी साखर किंवा मिळाली तर बुरा साखर नीट मिसळून त्यात गरम तूप घालून लाडू वळावे.
– चविष्ट लाडू तयार

वाढणी/प्रमाण:
खाल तसं
अधिक टिपा:
– पीठ तयार करण्याचं प्रमाण १:१ आहे. सुंठ, वेलची गोड प्रकार करतांना आवडीप्रमाणे वाढवता येतील.
– तिखट प्रकारात कुठलीही भाजी किसून/ठेचा प्रकार करून घेऊ नका. पदार्थ नीट होत नाही. एक्स्पेक्टेड टेक्श्चर आणि पर्यायानी चवही साधणार नाही. फुप्रोतून एक ब्लिट्झ देऊन चालतील भाज्या.
– पोहे जरा तेलावरच करणं आवश्यक आहे. नुसते भाजून घेतले तर त्याला पीठ चिकटणार नाही.
– पीठ तयार करायलाच काय तो वेळ लागतो. नंतरच्या कृती फटाफट होतात.
– उन्हाळ्यात मोस्टली हा प्रकार शक्यतो केला आणि खाल्ला जातोच आमच्या घरी कारण सातूचं पीठ थंड असतं आणि एकदा खाल्लं की बराच वेळ भूक धरवते
– सकाळच्या नाश्त्याला गोड पीठ ५ मिनिटात होतं. यात गूळाऐवजी साखर वापरली तरीही चालेल.
– तान्ह्या बाळांनाही हे देता येतं; त्यांच्याकरता तयार करतांना चमचाभर पीठ, अर्धा चमचा साखर, कणीभर मीठ हे अर्धे दूध, अर्धे पाणी वापरून पातळ (कढी/पन्ह्यासारखं) करून मग भरवावं (आवश्यक वाटलं तर पेडीचा सल्ला नक्की घ्यावा)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*