साहित्य : दोन कप हरबरा डाळ, २ कप गूळ, पाव कप साखर, अर्धा कप खवा, 2 टेबलस्पून काजू-बदाम पावडर, १ टेबलस्पून वेलची पूड, पाव टेबलस्पून जायफळ पूड, मीठ चवीने (आवडत असेल तर).
पोळीसाठी : २ कप गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून मैदा, २ टेबलस्पून तेल, मीठ चवीने. पोळी लाटायला तांदळाची पिठी.
कृती : हरबरा डाळ निवडून, स्वच्छ धुऊन १५-२० मिनिटे भिजत ठेवावी म्हणजे चांगली शिजते. मग कुकरमध्ये डाळ शिजवायची असेल तर २ कप डाळीला ५ कप पाणी घालावे. पाणी घातल्यावर कुकरचे झाकण बंद करून ४-५ शिट्या काढाव्यात मग मंद विस्तवावर ५ मिनिटे डाळ शिजू द्यावी. कुकर उघडल्यावर डाळ चाळणीवर काढून जास्तीचे पाणी काढून घ्यावे. त्यालाच कट म्हणतात. कट काढल्यामुळे पुरणपोळी हलकी होते. कट काढून शिजलेली डाळ परत कुकरमध्ये घालून गूळ-साखर घालून चांगले घोटावे. गूळ साखर घातल्यावर ते पातळ होईल मग ते घट्ट होत जाईल. घट्ट व्हायला लागल्यावर खवा, वेलचीपूड, जायफळ पूड, काजू-बदाम पूड घालून मिक्सघ करावे. पुरण चांगले घट्ट शिजवावे म्हणजे झारा मध्ये उभा राहील पडणार नाही. मग गरम गरम पुरण पुरणयंत्रातून वाटून घ्यावे. गव्हाचे पीठ मैदान चाळून घ्यावे व त्यामध्ये मीठ व तेल मिक्स् करून दूध व पाणी मिक्स करून कणिक सैलसर मळावी. दीड ते दोन तास तशीच बाजूला ठेवावी. मग तेलाचा वापर करून परत चांगली मळून घ्यावी. कणिक जेवढी जास्त मळली जाईल तेवढी पोळी सुंदर होईल. पिठाचे छोटे गोळे बनवून घ्यावेत. एक गोळा घेऊन पुरीसारखा लाटावा व पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट पुरण घेऊन लाटलेल्या पुरीवर ठेवावे व पुरी बंद करून लाटून घ्यावी. पोळी तांदळाच्या पिठीवर लाटून घ्यावी म्हणजे पोलपाटाला चिकटणार नाही. मग पोळी मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. गरम-गरम पोळी साजूक तूप घालून सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply